कोरोना विशिष्ट पक्षाच्या लोकांना होत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:40+5:302021-05-28T04:20:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : कोरोना काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना सांगून येत नाही किंवा होतही नाही, अशी बोचरी टीका ...

कोरोना विशिष्ट पक्षाच्या लोकांना होत नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : कोरोना काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना सांगून येत नाही किंवा होतही नाही, अशी बोचरी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी हुतात्मा गटावर कुणाचेही नाव न घेता केली, तसेच आम्ही सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाचा गावातील व आसपासच्या गावातील कोरोना पेशंटनी याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
वाळवा येथील हुतात्मा चौक नजीकच्या जिल्हा परिषद शाळा नंबर दोनमध्ये पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. दोन ऑक्सिजन मशीन सोयी उपलब्ध केल्या आहेत. विलगीकरण कक्षाचे उद्घाटन दिलीप पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार शेळके, तालुकाध्यक्ष विजय पाटील, वाळवा पंचायत समितीचे उपाध्यक्ष नेताजी पाटील, तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संग्रामसिंह पाटील उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी यांनी विलगीकरण कक्षासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. गावचे धन्वंतरी डॉ. संताजी थोरात यांनी पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे.
विलगीकरण कक्षाचे प्रमुख संचालक धनाजी शिंदे यांनी स्वागत केले. सचिन कदम, विक्रम शिंदे यांनी विलगीकरण कक्षाची व केल्या जाणाऱ्या सोयींची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किसन गावडे, मिलिंद थोरात, राजारामबापू बँक संचालक जयकर गावडे, जालिंदर थोरात, चंद्रशेखर शेळके, अक्षय फाटक, राजेंद्र औंधकर उपस्थित होते. विक्रम शिंदे यांनी आभार मानले.