कोरोनामुळे रोजगार हमीच्या कामांची मंजुरी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:29+5:302021-06-10T04:18:29+5:30

सांगली : मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांच्या मंजुरीला कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. गावात ...

Corona delayed the approval of employment guarantee works | कोरोनामुळे रोजगार हमीच्या कामांची मंजुरी रखडली

कोरोनामुळे रोजगार हमीच्या कामांची मंजुरी रखडली

सांगली : मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांच्या मंजुरीला कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. गावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये चर्चा करून कोणत्या यंत्रणेमार्फत कोणते काम करावयाचे याचा निर्णय घेतला जातो. मात्र, सध्या ग्रामसभा हाेत नसल्याने नवीन कामांना मंजुरी रखडली आहे. गेल्यावर्षी मंजुरी मिळालेल्या कामावर सध्या ९ हजार २४६ मजूर काम करत आहेत तर नव्याने ११९ कामांना मंजुरी मिळाली आहे.

रोहयो कामांच्या मंजुरीस अडचणी येत असल्याने बेरोजगारांची घालमेल होत असून, त्यांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामसभा अथवा गावपातळीवरील मजुरांची बैठक घेऊन कामांना मंजुरी द्यावी व रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या दाेन्ही लाटांनी जनजीवन पुरते उद्ध्वस्त करून टाकले आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गावी आलेल्या मजुरांना रोहयोवरील कामांमुळे दिलासा मिळाला होता. त्यामुळे हे मजूर वर्षभरापासून आपल्याच गावी थांबले आहेत. रास्त भाव दुकानातून मोफत व सवलतीच्या दरात धान्य मिळत असल्यानेही मजुरांची सोय होत आहे. मात्र, सध्या ग्रामसभा होत नसल्याने नवीन कामांची मंजुरी रखडली आहे.

चौकट

तालुका मजूर संख्या

आटपाडी १०३०

जत २७०२

कडेगाव ४२३

कवठेमहांकाळ ८३९

खानापूर ४८१

मिरज ७९०

पलूस ४०४

शिराळा ४७२

तासगाव ८११

वाळवा १२९४

एकूण ९२४६

कोट

रोहयोतून सध्या कामाची सोय असली तरी हे काम संपल्यानंतर पुढील काम सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही गावावरच राहिलो आहोत. प्रशासनाने आम्हाला मदत करत नवीन कामे द्यावीत, हीच विनंती आहे.

जयवंत शिंदे, मजूर

कोट

मजुरीसाठी मुंबईला होतो. गेल्यावर्षी गावात आल्यानंतर या कामावर जात आहे; पण नवीन काम मंजूर झाले नसल्याने हात थांबले आहेत. आता रोजगारासाठी इतर गावात जावे लागत आहे. सध्या मशागतीची कामे सुरू असल्याने शेतातील कामांसह ही कामे करता येतील.

संजय वगरे, मजूर

चौकट

ग्रामसभा नसल्याने रखडलेल्या प्रशासकीय मंजुरीमुळे एप्रिल महिन्यापासून केवळ ११९ गावांतच कामांना मंजुरी मिळाली आहे. गेल्यावर्षी मंजूर झालेल्या कामांचीच पुढील स्तरातील कामे सध्या सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने काम मंजूर झाल्यास दहा हजारांवर मजुरांच्या हाताला काम मिळू शकते.

Web Title: Corona delayed the approval of employment guarantee works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.