कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार, अनेक ठिकाणी लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:29+5:302021-05-13T04:26:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गरजवंताला अक्कल नसते, असे म्हटले जाते, ते आता कोरोना काळात सत्य बनले आहे. सामान्य ...

कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार, अनेक ठिकाणी लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गरजवंताला अक्कल नसते, असे म्हटले जाते, ते आता कोरोना काळात सत्य बनले आहे. सामान्य रुग्णांच्या गरजवंत नातेवाइकांच्या खिशावर रक्त व अन्य चाचण्यांसाठी प्रयोगशाळा डल्ला मारत आहेत. मनमानी पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात असल्याची बाब समोर आली आहे. या सर्वांवर कोणी नियंत्रण ठेवणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात ४५ डायग्नोस्टिक सेंटर आहेत. त्यापैकी सांगलीतच ११ सेंटर्स आहेत. यातील बहुतांश प्रयोगशाळेत चाचण्यांसाठी वेगवेगळे दर लावण्यात आले आहेत. एचआरसीटीचे फलक महापालिकेने झळकावून त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिल्याने, हे दर बऱ्याच ठिकाणी सारखे असले, तरी अन्य चाचण्यांच्या दरात भरमसाठ फरक दिसून येतो. सोयीप्रमाणे दर लावले जाताहेत. त्यांचा दरफलक एकाही सेंटरमध्ये लावलेला नाही.
चौकट
चाचणी लॅब १ लॅब २ लॅब ३
अँटिजन १५० ६०० २००
आरटीपीसीआर ३००० ३००० ३०००
सीबीसी ३०० ४०० ३००
सीआरपी ४०० ४५० ४५०
डीडायमर १२०० ९०० ९००
एलएफटी ७०० ८०० ७००
केएफटी १२० २२० २००
चौकट
यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे का?
बहुतांश डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये कुठेही चाचण्यांचे दरफलक दिसले नाहीत. हे दर लावणे बंधनकारक असताना, कुठेही लावले जात नाहीत. त्यांची तपासणी व याबाबत कोणी विचारणा करीत नसल्याने, या प्रयोगशाळांची मनमानी सुरू आहे.
चौकट
एजंटगिरी आणि टक्केवारी
वैद्यकीय क्षेत्रात या चाचण्यांमध्ये एजंटगिरी व टक्केवारीला ऊत आला आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या पावत्यांची पडताळणी केली, तर या गोष्टी उजेडात येऊ शकतात.
प्रत्येकाला दर वेगळा लावण्यामागे एजंटगिरी असते. जादा दर आकारून ज्याने रुग्णाला संबंधित लॅबला पाठविले, त्याचे खिसे गरम होतात. अमुक लॅबमध्ये गेल्यास दर कमी होतील, असे या एजंटांकडून सांगितले जाते.
ही एजंटगिरी थांबवायची असेल, तर शासन व प्रशासकीय स्तरावर दर निश्चित करून त्यांचे फलक सर्वत्र लावणे गरजेचे आहे.