बालरुग्णांसाठी मिरजेत ५० आयसीयु बेडचे कोरोना सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:13+5:302021-09-17T04:32:13+5:30
सांगली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर उपचारासाठी मिरजेत शासकीय रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात ५० आयसीयु बेडचे सेंटर सुरू करण्याची ...

बालरुग्णांसाठी मिरजेत ५० आयसीयु बेडचे कोरोना सेंटर
सांगली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर उपचारासाठी मिरजेत शासकीय रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात ५० आयसीयु बेडचे सेंटर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी आतापर्यंत दोन कोटी रूपये खर्च झाला आहे. जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, रुग्णालयात नवीन २१ किलोलीटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची उभारणीही पूर्णत्वाकडे आली आहे. त्यासाठी ६० लाख रूपये खर्च झाला आहे.
त्यांनी शासकीय रूग्णालयात भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, विद्युत विभागाचे शीतल शहा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्नशील आहोत. आलीच तर, तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहेत.
यामध्ये दररोज प्रत्येकी १२५ जम्बो सिलिंडर भरणारे दोन प्लांट आहेत. तर उर्वरित प्लांटमधून २५० जम्बो सिलिंडर्स प्रतिदिन भरण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णालयात सर्व वॉर्डना योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोयीस्कर होणार आहे.
ते म्हणाले, पोस्ट कोविड रुग्णांचे प्रमाणही वाढत असून त्यांच्यावर उपचार गरजेचे आहेत. त्यासाठी रुग्णालयात पोस्ट कोविड उपचार सेंटरची कार्यवाही व्हावी. कोरोना काळात रुग्णालयाचे अद्ययावतीकरण झाले असून विविध प्रकारच्या मशिनरी येथे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणारा वीज पुरवठा मात्र पूर्वीचाच असल्याने सद्यस्थितीतील वीज पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून एक ऑक्सिजन प्लँट मंजूर झाला असून तो उभारण्यासाठी जागेची निश्चिती करावी. रुग्णालयास लागणारी आवश्यक साधनसामग्री तसेच उपकरणे यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत. याचा निधी प्राधान्यक्रम ठरवून दिला जाईल. उपकरणांचे, मशिनरीचे तसेच विविध प्लँटचे ऑडिट करावे.