कोरोनामुळे मृत्यूची छाया झाली गडद; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:43+5:302021-05-31T04:19:43+5:30
सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या प्रत्येकाला आरोग्याची आणि भविष्याची चिंता सतावताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग ...

कोरोनामुळे मृत्यूची छाया झाली गडद; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढतेय
सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या प्रत्येकाला आरोग्याची आणि भविष्याची चिंता सतावताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग झाला नसला तरी भविष्यकालीन तरतुदी करण्यास अनेकजण प्राधान्य देत आहेत. आता कोरोनामुळे मृत्यूची शक्यता अधिक असल्याने अनेकांनी आपल्या पश्चात होणारे वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना कालावधीअगोदर मृत्यूपत्रांचे प्रमाण खूपच नगण्य होते. उपनिबंधक कार्यालयात वकिलामार्फत ते करावे लागते. त्यात अशी मोठी वाढ झाली नसली तरी प्रमाण वाढले आहे.
शेती, संपत्तीवरून असलेले वाद, सांभाळण्यास दिलेला नकार आणि नाहक त्रासाला कंटाळून अनेकजण मृत्यूपत्र करत असतात. मृत्यूपत्र एकाच व्यक्तीच्या आणि कोणाच्याही नावावर करता येऊ शकते. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीने मृत्यूपत्र करायची इच्छा व्यक्त केल्यास डॉक्टरांच्या देखरेखीखाली व वकिलांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करता येते. कोरोना काळात मात्र, असे एकही मृत्यूपत्र झालेले नाही. तरीही एकूण मृत्यूपत्रांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
चौकट
साथ न देणाऱ्यांना उत्तर
सांगली जिल्ह्यात अगोदरपासूनच मृत्यूपत्राचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे. उभारीच्या काळात नातेवाईकांनीच सोडलेली साथ, कुटुंबाने दिलेली वागणूक याला कंटाळून अनेकजण मृत्यूपत्र तयार करतात. आजारपणात अडचणीत सांभाळलेल्या व्यक्तीपोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही अनेकजण हा मार्ग अवलंबतात.
चौकट
आई - वडिलांनी मुलाला मोठ्या कष्टाने नोकरी लावली असतानाही लग्नानंतर पत्नी वारसदार बनते. यातून अनेक कुटुंबात अडचणी येतात. आई - वडिलांनाही मदत केली जात नाही, त्यामुळेच मग काही आई - वडीलही वारसा हक्कानुसार न्याय मागत असल्याची उदाहरणे आहेत.
चौकट
जिल्ह्यात वर्षाला साधारणपणे २० ते ३५ मृत्यूपत्राची नोंदणी होत असते. यातील काही नोंदणी या निबंधक कार्यालयात, तर काही नोटरीसुध्दा केल्या जातात. एखाद्या वर्षी त्यातही घट होत असली तरी आता मात्र याच प्रमाणात नोंद होत आहेत.
कोट
आपल्यानंतर संपत्तीवरून वादविवाद होऊ नयेत, यासाठी मृत्यूपत्र केले जाते. कोरोना काळात असे प्रमाण वाढले नसले तरी अनेकांना त्याची गरज वाटू लागली आहे. आरोग्याची काळजी घेणाऱ्यालाही मदत होते. त्यामुळे सध्या मृत्यूपत्राची प्रक्रिया होत आहे.
ॲड. दीपक हजारे
कोट
गेल्या दोन वर्षांपेक्षा मृत्यूपत्राचे प्रमाण वाढले असले तरी कोरोनामुळे वाढले असे वाटत नाही. आपल्याला जिवंतपणी आपला पैसा, संपत्ती बघून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने सांभाळणाऱ्या व्यक्तीस याव्दारे अधिकार दिले जातात.
ॲड. विक्रांत वडेर