जिल्ह्यात २६४ जणांना कोरोना; तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:55+5:302021-04-05T04:23:55+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढ रविवारीही कायम होती. शनिवारपेक्षा बाधितांच्या संख्येत थोडी घट झाली असली तरी २६४ नव्या रुग्णांची ...

जिल्ह्यात २६४ जणांना कोरोना; तिघांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढ रविवारीही कायम होती. शनिवारपेक्षा बाधितांच्या संख्येत थोडी घट झाली असली तरी २६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मिरज शहरातील दोघांसह वाळवा तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असल्याने चिंता वाढली असून सलग बाराव्या दिवशी दोनशेपेक्षा जादा रुग्ण आढळले आहेत. महापालिका क्षेत्रात दिवसभरात १०७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर कडेगाव, जत आणि वाळवा तालुक्यांतील रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. महापालिका क्षेत्रात सांगलीतच ७८ नवे रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत ९६७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १५१ जण बाधित आढळले आहेत. रॅपिड ॲण्टिजेनच्या ९१५ चाचण्यांमधून १२३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत सध्या २५७० रुग्ण उपचार घेत असून त्यातील २६२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील तब्बल २३० जण ऑक्सिजनवर तर ३२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ७ तर सोलापूर, सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५२७८०
उपचार घेत असलेले २५७०
कोरोनामुक्त झालेले ४८३९७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८१३
रविवारी दिवसभरात
सांगली ७८
मिरज २९
कडेगाव, जत प्रत्येकी २६
तासगाव २०
वाळवा १८
आटपाडी १७
खानापूर १६
पलूस १४
मिरज, शिराळा प्रत्येकी ७
कवठेमहांकाळ ६
चौकट
रुग्णालयांची संख्या वाढली
कोरोनावर उपचार घेण्यासाठी आता रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. सध्या ११ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसह ९ ग्रामीण रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, १९३४ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. ११९ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.