बाजार समितीच्या विकासासाठीच एकत्र
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:36:51+5:302015-07-25T01:13:29+5:30
मोहनराव कदम : वांगी येथे शेतकरी विकास पॅनेल प्रचारार्थ बैठक

बाजार समितीच्या विकासासाठीच एकत्र
वांगी : तालुकास्तरीय राजकारण बाजूला ठेवून बाजार समितीच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जास्तीत जास्त मतदान करवून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले.वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा साखर कारखान्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते.कदम म्हणाले, आम्ही कधीही लबाडीचे राजकारण केले नाही. सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन शेतकरी विकास पॅनेल तयार केले आहे. आमच्याबरोबर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर यांच्यासह अन्य मंडळी असून ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तालुक्यात असणारे एक न् एक मत हे झालेच पाहिजे. यासाठी युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या पॅनेलमध्ये नवीन युवकांना संधी दिली आहे. त्यांनी या संधीचे सोने करून दाखविणे गरजेचे आहे. सोनहिरा कारखान्याने ताकारी योजनेसाठी ८२ लाख रूपये जमा केले असून योजनेचे पाणी लवकर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी नथुराम पवार, सुभाष मोरे, दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, व्यंकटराव पवार, वांगीच्या सरपंच मनीषा कांबळे, सुभाष मोरे, येवलेवाडीचे माजी सरपंच संभाजी जगताप, पांडुरंग पोळ, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, ‘सोनहिरा’चे संचालक दिलीप सूर्यवंशी, युवराज कदम, माजी उपसभापती मोहन मोरे, संजय साळुंखे, अधिकराव जाधव यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)