इस्लामपुरात रस्त्याच्या कामावरून वादंग
By Admin | Updated: August 7, 2015 22:22 IST2015-08-07T22:22:40+5:302015-08-07T22:22:40+5:30
राजकीय वाद पेटला : पावसाळ्यात रस्ते करण्याचा बेकायदेशीर ठेका दिल्याचा आरोप

इस्लामपुरात रस्त्याच्या कामावरून वादंग
अशोक पाटील - इस्लामपूर नगरपालिकेच्या फंडातून अंबाबाई देवालयासमोरील रस्ता पावसाळ्यात झालाच कसा? असा सवाल माजी नगरसेवक वैभव पवार यांनी उपस्थित केला आहे. यावर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी, हा रस्ता कोणी केला हे माहीत नसल्याचे स्पष्ट करीत हात वर केले आहेत. विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी, हा रस्ता पालिका फंडातून पाऊस नसताना झाल्याचे सांगून या रस्त्याच्या गोपनीयतेवर पडदा टाकला आहे. परंतु त्यांनी हा रस्ता दांडगाव्याने व ठेकेदारावर दबाव आणून जबरदस्तीने करवून घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.इस्लामपूर शहरात विविध फंडातून होणाऱ्या रस्त्यांचे राजकारण चांगलेच पेटले होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांची कामे आटोपून घेण्यात आली आहेत. परंतु आता वाय-फायच्या नावाखाली पुन्हा रस्ते उखडले जात आहेत. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्याचे निकृष्ट काम होत असताना, माजी नगरसेवक वैभव पवार आणि त्यांचे बंधू विजय पवार यांनी ठेकेदारांकडून हे रस्ते चांगल्या दर्जाचे करवून घेण्यासाठी जातीने लक्ष घातले होते. तसेच त्यांच्या जोडीला विरोधी पक्षनेते विजय कुंभार, नगरसेवक कपिल ओसवाल यांची साथ होती. शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. चांगले रस्ते होण्यासाठी विजय कुंभार यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविला असला तरी, त्यांनी स्वत:च्या घराजवळील रस्ता करताना सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. पावसाळ्यात रस्ता करता येत नसतानाही त्यांनी हा रस्ता केला असल्याने, सत्ताधारी मंडळींचे पित्त चांगलेच खवळले आहे. त्यामुळेच त्यांनी, या रस्त्यासाठी कोठून निधी आला, कोणी मंजूर केला आदी प्रश्नांबाबत हात वर केले आहेत.वैभव व विजय पवार यांनी रस्त्याची कामे सुरु असताना विनाकारण कामात अडथळा आणल्याने शहरातील काही रस्ते अपूर्ण राहिल्याचा आरोप सत्ताधारी मंडळी करीत आहेत. सध्या पालिका फंडातून होणाऱ्या रस्त्यांचे काम पावसाळा असल्याने बंद आहे. परंतु ऐन पावसाळ्यात विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी स्वत:च्या घरानजीक असलेल्या अंबाबाई देवालयासमोरील रस्त्याचे काम केले आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांना काहीही माहिती नसल्याची भूमिका विजयभाऊ पाटील यांनी घेतली आहे.
सत्ताधाऱ्यांना या कामाबाबत माहिती असूनही कुंभार यांच्यावर कडी करण्याच्या हेतूनेच त्यांचा कांगावा सुरु आहे. पाऊस नसताना हा रस्ता केला आहे. तसेच या कामासाठी पालिका फंडातून निधी मंजूर झाल्याचे विजय कुंभार यांनी स्पष्ट करीत विजय पाटील यांचा आरोप खोडून काढला आहे. बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अविनाश जाधव यांनी, हा रस्ता दोन दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितल्याने, रस्त्याचे काम पावसाळ्यातच झाले आहे, हे स्पष्ट होते.
कुरघोड्यांच्या खेळ््या
राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विजय पाटील सत्ताधाऱ्यांना माहिती नसल्याचे सांगत आहेत. नगरसेवक विजय कुंभार मात्र सत्ताधाऱ्यांना याची कल्पना आहे, पावसाळा असला तरी रस्ता केला तेव्हा पाऊस नव्हता, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय माजी नगरसेवक वैभव पवार हेही, पावसाळ्यात रस्ता झालाच कसा? असा प्रश्न उपस्थित करुन, विजय पाटील, विजय कुंभार यांच्यावर कडी करीत आहेत. यामुळे सध्या या रस्त्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. एकूणच या कुरघोड्यांमुळे पालिकेतील वातावरण सध्या गरम आहे.
सत्ताधारी टार्गेट
विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी गेल्या महिन्यापासून इस्लामपूर पालिकेची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याचा सपाटा लावला आहे. शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न त्यांनी नव्याने चर्चेत आणले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ऐन पावसाळ्यात केल्या गेलेल्या रस्त्याच्या कामाचा मुद्दा उचलून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.