उमदी पोलिसांचा कारभार वादात
By Admin | Updated: June 17, 2016 00:28 IST2016-06-16T23:10:35+5:302016-06-17T00:28:17+5:30
दोन घटनांनी खळबळ : पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याचा कु टुंबियांकडून आरोप

उमदी पोलिसांचा कारभार वादात
गजानन पाटील --संख -जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाणे चर्चेत राहिले आहे. या महिन्यात संशयितांनी केलेली आत्महत्या, संख पोलिस चौकीत एक संशयास्पद झालेला मृत्यू, या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे. या दोन घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांनी घातपाताचा, पोलिस मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप केलेला आहे. या दोन घटनांचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. या घटनेने उमदी पोलिस ठाण्याचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ठाण्याचा कारभार सुधारण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. जत पूर्व भागातील अहमदनगर-विजापूर महामार्गावर उमदी पोलिस ठाणे आहे. पोलिस ठाण्याअंतर्गत ५२ गावांचा समावेश आहे. संख व माडग्याळ या पोलिस चौक्या आहेत. एकूण लोकसंख्या १ लाख ८० हजार ६३० इतकी आहे. कर्नाटक सीमेलगत हे पोलिस ठाणे आहे. सीमेलगत चालणारे अवैध धंदे, खून, मारामारी, तस्करी यांचा क्राईम रेट सर्वात जास्त आहे.
चंदन, गांजा, वाळू, दारू हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस ठाण्यातील हद्दीचा वापर केला जातो. खून, मारामारी, अपहरण यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. या पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्याची नेमणूक ही शिक्षा मानली जाते. पण येथे आलेला कर्मचारी परत दुसरीकडे जाण्यासाठी तयार होत नाही, हा इतिहास आहे. पोलिस ठाण्याअंतर्गत करेवाडी (को. बोबलाद), करेवाडी (तिकोंडी), जाडरबोबलाद, पांढरेवाडी, सोन्याळ, उटगी, आसंगी तुर्क, उमदी, सनमडी ही गावे संवेदनशील आहेत.
१२ मे रोजी अंकलगी (ता. जत) येथील लालसाब ऊर्फ इनूस गुडुसाब अपराध (वय ४०) यांचा संख येथील पोलिस चौकीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. मृत लालसाब अपराध यांची पत्नी बैतुला अपराध यांनी, सतत होणाऱ्या मारहाणीस कंटाळून पतीच्या विरोधात उमदी पोलिसात चार दिवसांपूर्वी लेखी तक्रार अर्ज दिला होता. यावरुन पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी गुरुवारी दुपारी संख पोलिस चौकीत बोलावले होते. दरम्यान, लालसाब यांचा मृत्यू झाला होता. पत्नी बैतुला यांनी, पोलिस मारहाणीतच मृत्यू झाला, अशी तक्रार केली. इनकॅ मेरा शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला.
मात्र राजकुमारने आत्महत्या केलेल्या शौचालयाची उंची कमी आहे. तेथे रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याइतपत जागा नाही. आत्महत्या केल्यानंतर नातेवाईकांना उशिरा त्याची माहिती देण्यात आली. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही बसविलेले असतानाही संशयित आरोपीने शौचालयात जाऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत ही घटना कशी कळली नाही? यामुळे एकूणच कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
आसंगी येथील कौटुंबिक वादातील तक्रारीवरुन पोलिसांनी एका युवकाचे मुंडण केले होते. या प्रकरणातही पोलिसांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता.महिन्याभरातच घडलेल्या दोन घटनांनी पोलिसांची अब्रू गेलेली आहे. आता पोलिसांच्या समुपदेशनाची गरज आहे. चांगला पारदर्शी कारभार करुन लोकांचा विश्वास मिळविण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर आहे.
आत्महत्या : पोलिस ठाण्यात७ जून रोजी गुलगुंजनाळ (ता. जत) येथे गंगुबाई अवगोंड नंदगोंड यांच्या झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपी राजकुमार गुंडाप्पा नंदगोंड ( घुमकनाळ, जि. विजापूर) यांनी उमदी पोलिस ठाण्याच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलगुंजनाळ येथील जंगलात गंगुबाई नंदगोंड या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यामध्ये संशयित म्हणून राजकुमार व सासरा गुंडाप्पा या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी राजकुमारने आत्महत्या केलेली होती, मात्र वडिलांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
आरोपींचे कोठडीतून पलायन
२२ मार्च २००५ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याला हादरवून सोडणारी एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळल्याची घटना घडली होती. त्यामध्येही संशयित म्हणून उमदी पोलिस ठाण्यातील १ पोलिस होता. ६ फेब्रुवारी २००६ रोजी पोलिस कोठडीतून ३ आरोपींनी पलायन केले होते.