कासेगावात दूषित पाणी
By Admin | Updated: April 20, 2015 00:04 IST2015-04-19T23:31:48+5:302015-04-20T00:04:19+5:30
ग्रामस्थ संतप्त : प्रभाग ४ मध्ये पाण्यात पक्ष्यांची पिसे, कचरा

कासेगावात दूषित पाणी
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्रभाग क्र. ४ मध्ये गेल्या चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. रविवारी तर अक्षरश: पाण्यातून पक्ष्यांची पिसे, केस, इतर कचरा आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांतून ग्रामपंचायतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कासेगाव येथील प्रभाग क्र. ४ हा बाजारपेठेपासून जुना स्टँड रोडवरील पश्चिम भागापर्यंत पसरला आहे. शुक्रवारी दि. १७ रोजी याठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला होता. त्यावेळी काही ठिकाणी अत्यंत गढूळ पाणी पुरवठा झाला होता. मात्र टाकी धुतली असावी म्हणून ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु रविवारी पुन्हा सकाळी पाणी सुटल्यानंतर पुन्हा एकदा दूषित पाणी पुरवठा सुरु झाला.यावेळी चक्क पाण्यातून पक्ष्याची पंखे, कचरा, केस मिळून आले. त्यामुळे लोकांच्यात घबराट निर्माण झाली आहे. यावेळी या प्रभागातील अॅड. संदीप पाटील, शंकर पाटील, दस्तगीर मुल्ला, श्रीरंग पाटील, अमोल वीर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर ए. पी. जाधव व जलस्वराज्य प्रकल्पाचे पंप आॅपरेटर सुनील माने यांना तातडीने बोलावून घेतले.
यावेळी पंप आॅपरेटर सुनील माने म्हणाले, दूषित पाण्याचा पुरवठा झाला हे खरे आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य निवास पाटील हेही उपस्थित होते. रविवारी उपसरपंच शिवाजी पाटील यांना हे दूषित पाणी प्रभागातील ग्रामस्थांनी दाखवले. यावर पाटील यांनी प्रभाग क्र. ४ मधील पाईपलाईनचे वॉशआऊट करुन घेतले जाईल, असे आश्वासन दिले.
वारंवार होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. अनेकांनी ग्रामपंचायतीच्या या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)