काश्मीरमधील मराठी बांधवांचा संपर्क तुटला

By Admin | Updated: September 9, 2014 23:46 IST2014-09-09T23:04:36+5:302014-09-09T23:46:09+5:30

नातेवाईक हवालदिल : जम्मू-काश्मीरला पुराचा तडाखा

Contact with Marathi brothers in Kashmir has been broken | काश्मीरमधील मराठी बांधवांचा संपर्क तुटला

काश्मीरमधील मराठी बांधवांचा संपर्क तुटला

विटा : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो लोक अडकून पडले असतानाच सोने-चांदी गलई व्यवसायानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या सांगली, सातारा जिल्ह्यातीलही शेकडो मराठी बांधवांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले असून, आज मंगळवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जम्मू-काश्मीरमधील मराठी बांधव व त्यांचे जिल्ह्यातील नातेवाईक यांच्यासाठी संपर्क केंद्र सुरू केले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अनेक नागरिक अडकले आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव व कडेगाव आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण यासह अन्य तालुक्यातील शेकडो लोक सोने-चांदी गलई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे या मराठी बांधवांनाही पुराचा फटका बसला आहे.
जम्मू-काश्मीरमधील आपल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न गावाकडील नातेवाईकांनी केला असता, कोणताही संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. याबाबत माजी आ. अनिल बाबर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना याबाबतची माहिती देऊन मराठी बांधवांच्या मदतीसाठी विनंती केली. त्यावेळी खा. राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर बाबर यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना लेखी पत्र देऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी, संपर्क केंद्र सुरू केले असून, मदतीसाठी नातेवाईकांनी ०२३३/२३७३०६३ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)

जिल्हाधिकारी कुशवाह यांनी संपर्क केंद्र सुरू केले असून, मदतीसाठी नातेवाईकांनी ०२३३/२३७३०६३ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन कुशवाह यांनी केले आहे.
सांगली, सातारा जिल्ह्यातीलही शेकडो मराठी बांधवांचा नातेवाईकांशी संपर्क तुटल्यामुळे नातेवाईक हवालदिल.

Web Title: Contact with Marathi brothers in Kashmir has been broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.