भाजपच्या राजकारणाला आघाडी काँग्रेसची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:41 IST2016-01-12T00:21:24+5:302016-01-12T00:41:11+5:30
कृष्णा कारखाना : अविनाश मोहिते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब

भाजपच्या राजकारणाला आघाडी काँग्रेसची किनार
अशोक पाटील --- इस्लामपूर -दक्षिण कऱ्हाड, वाळवा आणि कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्यावर भाजपच्या सहकार पॅनेलची सत्ता आहे. डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष आहेत, तर राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच काँग्रेसचे जितेंद्र पाटील हे जास्तीत जास्त वेळ कारखान्यासाठी देतात. त्यातच आता विरोधी संस्थापक पॅनेलचे प्रमुख व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक असून, नुकताच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे ‘कृष्णा’तील राजकारणाला आघाडी काँग्रेसची किनार लाभल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण कऱ्हाड मतदार संघात राजकीय समीकरणे नेहमीच बदललेली दिसतात. याच मतदार संघात कृष्णा कारखान्याचे राजकारण महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे गतवर्षी झालेल्या ‘कृष्णा’च्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, ‘रयत’चे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यामध्ये वाळवा तालुक्यातील बहुतांशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहकार पॅनेलला मिळाल्याने, त्यांना निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्याखालोखाल संस्थापक पॅनेललाही ५ जागा मिळाल्या, तर रयत पॅनेलचा धुव्वा उडाला.
दक्षिण कऱ्हाडचे माजी आमदार विलासकाका उंडाळकर व वाळव्याचे आमदार, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांची ताकद डॉ. सुरेश भोसले यांना मिळाली. वाळवा तालुक्यातील जयंत पाटील यांचे बहुतांशी समर्थक तिन्ही पॅनेलमध्ये विखुरले होते. त्यामुळे या निवडणुकीत जयंत पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली होती.
निवडणुकीत मोठा विरोध असतानाही संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्यासह इतर चौघे विजयी झाले. वास्तविक त्यांनी कारखान्यामध्ये राहून विरोधकाची भूमिका बजावणे गरजेचे असताना, त्यांनी कारखान्यातून पूर्णपणे लक्ष काढून घेत, फक्त पत्रकबाजीवर जोर दिला. परिणामी डॉ. सुरेश भोसले यांचा सुंठेवाचून खोकला गेला.
भविष्यातील राजकारणाचा विचार करुन अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीपासूनच ते राष्ट्रवादीकडे झुकलेले दिसत होते. परंतु उघडपणे त्यांनी कधीही तसे भासवून दिले नव्हते. आता मात्र त्यांनी थेट माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करुन आपल्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे. यापूर्वी अविनाश मोहिते आमदार अजितदादा पवार, आमदार जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करुन त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे दक्षिण कऱ्हाड मतदारसंघ आणि कृष्णा कारखान्याचे राजकारण कोणत्या वळणावर जाईल, हे येणारा काळच ठरवेल.
कृष्णा कारखाना : सर्वच पक्षांचे संचालक
य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. आमच्या सत्ताधारी सहकार पॅनेलच्या संचालक मंडळात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेचे संचालक आहेत. त्यामुळे अविनाश मोहिते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे कारखान्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया य. मो. कृष्णा कारखाना उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी व्यक्त केली.