काँग्रेसवाल्यांनो, सावध ऐका पुढल्या हाका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST2021-04-04T04:28:25+5:302021-04-04T04:28:25+5:30
श्रीनिवास नागे जयंत पाटील यांचे हिकमती नेतृत्व, रचलेल्या सावध चाली, सत्तेभोवती घिरट्या घालणारी दुसरी-तिसरी फळी, घरवापसीसाठी आसुसलेले नेते यामुळे ...

काँग्रेसवाल्यांनो, सावध ऐका पुढल्या हाका!
श्रीनिवास नागे
जयंत पाटील यांचे हिकमती नेतृत्व, रचलेल्या सावध चाली, सत्तेभोवती घिरट्या घालणारी दुसरी-तिसरी फळी, घरवापसीसाठी आसुसलेले नेते यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी मजबूत होत आहे. भाजपचे बहुतांश नेते पुन्हा जयंतरावांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागले आहेत. शिवसेनेची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. आता काँग्रेस पंखाखाली आली की, जिल्ह्यावर मांड पक्की, हे माहीत असल्याने जयंतरावांचे डावपेच सुरू झाले आहेत. मात्र ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे हाकारे काँग्रेसच्या सगळ्या गट आणि उपगटांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीत.
नुकतेच ‘मिशन महापालिका’ पार पडले. आता जिल्हा परिषदेतील उलथापालथ आहे. पाठोपाठ जिल्हा बँक, बाजार समितीच्या निवडणुका होतील. तेथे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि आपला गटच ‘पॉवरफुल’ ठरला पाहिजे, यासाठी जयंतराव पावले टाकत आहेत. काँग्रेसमधील काहींना ते आपल्याकडे वळवतीलच, शिवाय कदम-दादा गटात आणि उपगटांतही बत्ती लावून देतील, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी जयंतरावांनी मिरज पूर्वभागातील मदन पाटील गट राष्ट्रवादीत आणला. मदनभाऊंच्या निधनानंतर हा गट सैरभैर झाला होता. या गटाने लोकसभेला दोनदा भाजपच्या संजयकाका पाटलांना मदत केली. आता सत्तेच्या जोरावर जयंतरावांनी तो राष्ट्रवादीत आणला. हे करताना मिरज पूर्वभागातील सभापतींसह बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देऊन एका दगडात दोन पक्षी मारले. एकीकडे या भागात आपला गट वाढवत काँग्रेसला ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ दिला. सत्तेच्या जोरावर कार्यकर्ते फोडणाऱ्या भाजपचे उट्टे काढले आणि दुसरीकडे बाजार समितीसह पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठी पेरणी केली.
खानापूर-आटपाडीत राष्ट्रवादी संपण्याच्या वाटेवर असताना काँग्रेसवर नाराज झालेल्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला. तेथे काँग्रेसच्या कदम गटाने नेहमीच अनिल बाबर गटाला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे सदाशिवराव पाटील यांनी काँग्रेस सोडली होती. त्यांच्या माध्यमातून विटा शहरासह खानापूर-आटपाडीत राष्ट्रवादीला तगडा शिलेदार मिळाला आहे. आता तेथे प्रतीक्षा आहे आणखी एका मातब्बर गटाची..! (उत्तरार्ध)
चौकट
तासगाव-कवठेमहांकाळची नवी समीकरणे
तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचा आर. आर. पाटील गट भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटासोबत सख्ख्या भावासारखा राहत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंतरावांना हे खटकत नाही, कारण त्यांचा आणि संजयकाकांचाही दोस्ताना वाढला आहे. कवठेमहांकाळच्या सगरे गटाकडील महांकाली साखर कारखाना बंद पडला आहे. तो चालवण्यास घेण्यासाठी जयंतरावांच्या हालचाली सुरू आहेत. त्यावर राजारामबापू कारखान्याच्या पाचव्या युनिटची मोहोर उमटली, तर जतपाठोपाठ कवठेमहांकाळचे सहकार क्षेत्रही जयंतरावांच्या कब्जात येईल. तेथे नवी समीकरणे उदयास येऊन आर. आर. गट निष्प्रभ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेतृत्व-कर्तृत्व आणि निष्क्रियता
गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदापासून पक्षातील महत्त्वाची पदे कदम गटाकडेच आहेत. या गटाचे नेतृत्व आणि कर्तृत्व, पक्षकार्यातील मेहनतीला मिळालेले हे झुकते माप आहे. त्याचवेळी धरसोड वृत्ती आणि निष्क्रियतेमुळे दादा गट मागे पडल्याचे दिसून येते. अलीकडे विशाल पाटील गतीने सक्रिय झाले आहेत. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, बैठकीत ते पुढे असतात, पण त्यांच्याकडे काँग्रेसचे कोणतेच पद नाही. दोन्ही गटातील विसंवादामुळे विशाल पाटील यांना लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी लागली होती. बेरक्या जयंतरावांनी तर जाहीर कार्यक्रमात ‘स्वाभिमानीचे विशाल पाटील’ असा खवचट उल्लेख करण्याची संधीही सोडलेली नाही.
जत तालुक्यात लावली कळ
जतची आमदारकी काँग्रेसच्या विक्रम सावंत यांच्याकडे आहे. ते विश्वजित कदम यांचे मावसभाऊ. जतच्या पूर्वभागाला कर्नाटकातून पाणी देण्यासाठी ते झगडत आहेत. पण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रातूनच पाणी देण्याची खर्चिक योजना जयंतरावांनी पुढे आणली आहे. त्यासाठी सावंत यांचे विरोधक, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे, तर दुसरे विरोधक प्रकाश जमदाडे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत घेतलेही आहे. या हालचाली सावंत यांना दाबण्यासाठीच नव्हेत काय?