विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST2021-02-07T04:23:59+5:302021-02-07T04:23:59+5:30
सांगली : महाविकास आघाडीच्या चर्चेवेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढेही ते काँग्रेसकडेच राहील, असे मत कृषी ...

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार
सांगली : महाविकास आघाडीच्या चर्चेवेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढेही ते काँग्रेसकडेच राहील, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यावेळी कोणते पद कोणाकडे राहणार, याची सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळच्या तडजोडीनुसार हे पद काँग्रेसला मिळाले. त्यामुळे यावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हे पद काँग्रेसकडेच राहील, याबाबत आणखी कोणत्या घटक पक्षाचे काही मत असेल तर त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील.
ते म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार दिला आहे. त्यानंतर त्यांच्याकडे आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत आता पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील.
केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल ते म्हणाले की, भाजपने संपूर्ण देशात हुकूमशाही कारभार सुरू केला आहे. कोणाचेही म्हणणे ऐकून न घेण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी व अन्य घटकांचा विचार केला नाही तर येणारा काळ त्यांना माफ करणार नाही.