शिराळ्यातून काँग्रेस हद्दपार करणार
By Admin | Updated: June 16, 2016 01:09 IST2016-06-15T23:26:57+5:302016-06-16T01:09:09+5:30
शिवाजीराव नाईक : कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिराळ्यातून काँग्रेस हद्दपार करणार
शिराळा : गेली ३०-३५ वर्षे ज्यांनी गोरगरीब जनतेच्या जिवावर सत्ता उपभोगली, त्यांना सत्तेतून कायमचे हद्दपार करण्यासाठी शिराळा मतदार संघातील गोरगरीब लोक सज्ज झाले असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव नाईक यांनी केले. शिराळा येथील संपर्क कार्यालयात नूतन कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, तालुका भाजप अध्यक्ष सुखदेव पाटील, रघुनाथ पाटील, गजानन पाटील, संदेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी चिंचोली ग्रामपंचायतीच्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या सदस्यांचा आ. शिवाजीराव नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
आ. नाईक पुढे म्हणाले, शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील जनता गोरगरीब आहे, त्यांच्या गरिबीचा व अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन येथील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगली आहे. जि. प. सदस्य रणधीर नाईक म्हणाले, आ. शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांचा पक्षात योग्य तो मानसन्मान ठेवला जाईल. पक्षात आपण सगळे मिळून ताकदीने काम करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहोत.
यावेळी आर.पी.आय.चे पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल घोलप, नारायण जाधव, सी. एच. पाटील, एम. एस. कुंभार, तानाजी पवार, तानाजी घोडे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आ. नाईक यांच्याहस्ते शरद जाधव, संदीप घोलप, सखाराम परीट, सुवर्णा जाधव, सुरेखा पाटील, मालन गुरव या ६ चिंचोली ग्रामपंचायत सदस्यांना व कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)