भाजप हवे की कॉँग्रेस, हे राष्ट्रवादीने ठरवावे

By Admin | Updated: April 20, 2015 00:11 IST2015-04-19T23:43:10+5:302015-04-20T00:11:20+5:30

पतंगराव कदम : जिल्हा मध्यवर्ती बँक स्वबळावर लढण्यासाठी तयारी

Congress should decide whether the BJP wants it or not | भाजप हवे की कॉँग्रेस, हे राष्ट्रवादीने ठरवावे

भाजप हवे की कॉँग्रेस, हे राष्ट्रवादीने ठरवावे

कडेगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक कॉँग्रेस स्वबळावरच लढवणार आहे. जे बरोबर येतील, त्यांची मदत घेण्यास अडचण नाही. राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाणार की कॉँग्रेसबरोबर राहणार, हे आधी ठरवावे. त्यानंतरच राष्ट्रवादीबरोबर चर्चा होईल, असा इशारा माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी पतंगराव कदम म्हणाले की, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम व माजी मंत्री मदन पाटील हे दोन्ही नेते जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. अजूनही वेळ आहे. योग्यवेळी योग्य तो निर्णय दोघेही घेतील. काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असली तरी राष्ट्रवादीने ठरवावे की त्यांना काँग्रेसशी सख्य हवे आहे की भाजपशी. त्यानंतर आम्ही आघाडीबाबत चर्चा करू.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता आहे. निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यावर अंगात येते तसे अनेकांच्या अंगात आले आहे. परंतु, सभासदांच्या उसाला तोड वेळेवर मिळाली पाहिजे. कृष्णा कारखान्याचे कित्येक सभासद अद्याप कारखान्याने ऊस नेला नाही, यामुळे चिंतेत आहेत. अशा कारभाराला शेतकरी, सभासद थारा देणार नाहीत, असा टोला कदम यांनी सत्ताधारी अविनाश मोहिते यांना लगावला.
वांद्रे पोटनिवडणुकीबाबत ते म्हणाले की, शिवसेना-भाजपने एकसंध होऊन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नारायण राणे यांचा पराभव केला. परंतु, राणे हे खचून जाणारे नेतृत्व नाही. यापुढे ते त्यांच्या स्टाईलनेच राजकारण करतील.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणुका कॉँग्रेस स्वबळावर लढविणार आणि पारदर्शी राजकारण करणार आहे. लोक बदल करून पाहतात. आता भाजपचा कारभारही पाहत आहेत. अजून खूप वेळ आहे. कॉँग्रेसला निश्चितपणे गतवैभव प्राप्त होईल. मी अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत राजकीय वाटचाल केली आहे. यात अनेकांनी अडथळे आणले, तर अनेकांनी साथ दिली, असे डॉ. कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)


टीकांची दखल नाही
कुणीतरी काठावर विजय मिळवून आमदार होतो आणि मंत्रिपदाचा आव आणत टीका करतो. अशांनी केलेल्या टीकांची दखल घेण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना डॉ. कदम यांनी लगावला.

Web Title: Congress should decide whether the BJP wants it or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.