विधानसभा स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा ठराव

By Admin | Updated: June 10, 2014 02:12 IST2014-06-10T01:44:58+5:302014-06-10T02:12:59+5:30

मोहनराव कदम : स्वतंत्र लढण्यातच दोन्ही पक्षांचा फायदा

Congress resolution to fight Vidhan Sabha on its own | विधानसभा स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा ठराव

विधानसभा स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा ठराव

सांगली : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार करतानाच, त्याबाबतचा ठराव आज, सोमवारी काँग्रेस कमिटीमध्ये करण्यात आला. येत्या दोन दिवसांत प्रदेश व राष्ट्रीय कार्यकारिणीला हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कदम म्हणाले की, दुपारी काँग्रेस भवनात जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेससह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सर्वच पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही याबाबतचा ठराव केला आहे. सर्वच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वबळावर लढण्याबाबत एकमत दिसून येत आहे. २३ मे रोजी झालेल्या प्रांतिक कार्यकारिणीच्या बैठकीतही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अशीच आग्रही मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्रात स्वत्रंपणे दोन्ही काँग्रेसनी लढावे, असा मतप्रवाह वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनच असा सूर आता उमटत असल्याने पक्षाला या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येण्यास कोणाचीही हरकत नाही. सांगली जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व जागांवर काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची मागणी केली आहे. पक्षीय पातळीवर याचा निर्णय होण्यापूर्वीच आम्ही प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारीसाठी दोन किंवा तीन नावे सुचविण्याचे आदेश दिले आहेत. अशा नावांची यादी प्राप्त झाल्यानंतर ती प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात येईल. उमेदवारीचा निर्णय झाल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या पाठीशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंधपणे उभे रहावे, याबाबत आताच सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. तालुकानिहाय बैठकाही घेण्यात येतील. केवळ लोकसभा निवडणूक निकालाचा अनुभव घेऊन आम्ही ही मागणी करीत नाही. संभाव्य परिस्थिती, आघाडीअंतर्गत असणारे सध्याचे वातावरण व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या मागण्यांचाही विचार यामध्ये करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress resolution to fight Vidhan Sabha on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.