जत तालुक्यात कॉँग्रेसचा भाजपला धक्का
By Admin | Updated: July 27, 2015 22:57 IST2015-07-27T22:57:38+5:302015-07-27T22:57:38+5:30
चौदा ठिकाणी सत्ता : भाजपकडे सात, राष्ट्रवादीकडे चार ग्रामपंचायती

जत तालुक्यात कॉँग्रेसचा भाजपला धक्का
जत : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राष्ट्रीय कॉँग्रेस १४, भारतीय जनता पार्टी ७, राष्ट्रवादी कॉँग्रेस ४, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, राष्ट्रीय समाज पार्टी १, स्थानिक विकास आघाडीस २ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली आहे. दहा ग्रामपंचायतीत संत्तातर झाले आहे. वळसंग, शेड्याळ, येळदरी, मेंढीगिरी, सनमडी, भिवर्गी, उटगी, सिद्धनाथ, शेगाव, तळेवाडी, गुगवाड, धावडवाडी, सिंगणहळ्ळी, उंटवाडी या चौदा ग्रामपंचायतीत कॉँग्रेसची सत्ता आली आहे. तिकोंडी, करेवाडी (तिकोंडी), निगडी (बुद्रुक), जाह्याळ (खुर्द), लमाणतांडा (उटगी), घोलेश्वर, लमाणतांडा (दरीबडची) या सात ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे, तर अंकले, डोर्ली, कुलाळवाडी, सोनलगी या चार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेस अंकलगी, राष्ट्रीय समाज पक्षास कुडणूर, स्थानिक विकास आघाडीस मोरबगी व गुड्डापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली आहे. शेड्याळ, येळदरी, मेंढेगिरी, सनमडी, भिवर्गी, शेगाव, सिंगणहळ्ळी, उंटवाडी, अंकलगी, कुडणूर या दहा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे.
वळसंग ग्रामपंचायतीत कॉँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखली आहे. मेंढेगिरी ग्रामपंचायतीत भाजपचे कार्यकर्ते, बाजार समिती माजी संचालक रमेश बिराजदार यांची सत्ता होती. तेथे कॉँग्रेसचे सुरेश कांबळे यांनी बाजी मारली आहे. सनमडी ग्रामपंचायतीत भाजपचे पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांची सत्ता होती. त्यांना फक्त एक जागा मिळाली आहे, तर कॉँग्रेस पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत.
सिंगनहळ्ळी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. कॉँग्रेसने त्यांच्याकडून सत्ता हस्तगत केली आहे. उंटवाडी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. तेथे सत्तांतर होऊन कॉँग्रेसला सहा, तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.
भिवर्गी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य बिळ्यानी बिराजदार यांची सत्ता होती. तेथे संत्तातर होऊन कॉँग्रेसला सहा, तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.
उटगी ग्रामपंचायतीत भाजपचे जत पंचायत समिती माजी सभापती बसवराज बिराजदार यांची सत्ता होती. तेथे संत्तातर झाले असून, त्यांना एकही जागा मिळाली नाही. संपूर्ण तेरा जागांवर कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत.
शेगाव ग्रामपंचायतीत भाजपचे माजी सरपंच लक्ष्मण बोराडे यांची सत्ता होती. येथे संत्तातर होऊन कॉँग्रेसला नऊ, तर भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. तिकोंडीत काट्याची लढत होऊन कॉँग्रेसचे अॅड. हादीमणी यांना सहा, तर भाजपला सात जागा मिळाल्या. गुड्डापूर ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता आली आहे. (वार्ताहर)
शेतकरी संघटनेचा चंचुप्रवेश
वळसंग, शेड्याळ, येळदरी, मेंढीगिरी, सनमडी, भिवर्गी, उटगी, सिद्धनाथ, शेगाव, तळेवाडी, गुगवाड, धावडवाडी, सिंगणहळ्ळी, उंटवाडी या चौदा ग्रामपंचायतीत कॉँग्रेसची सत्ता आली आहे. तिकोंडी, करेवाडी (तिकोंडी), निगडी (बुद्रुक), जाह्याळ (खुर्द), लामणतांडा (उटगी), घोलेश्वर, लमाणतांडा (दरीबडची) या सात ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे, तर अंकले, डोर्ली, कुलाळवाडी, सोनलगी या चार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला सत्ता मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेस अंकलगी, राष्ट्रीय समाज पक्षास कुडणूर, स्थानिक विकास आघाडीस मोरबगी व गुड्डापूरमध्ये सत्ता मिळाली आहे. त्यांचा हा चंचुप्रवेश प्रस्थापितांना इशारा मानला जात आहे.