जामदार-आवटी संघर्षात काँग्रेसची फरफट
By Admin | Updated: September 3, 2015 23:32 IST2015-09-03T23:32:13+5:302015-09-03T23:32:13+5:30
एकमेकांवर कुरघोडी : महापौरही अडकले ऐनवेळच्या ठरावात; महापालिकेवर वर्चस्वासाठी संघर्ष

जामदार-आवटी संघर्षात काँग्रेसची फरफट
शीतल पाटील --सांगली महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील छुप्या संघर्षाने पुन्हा डोके वर काढले आहे. गटनेते किशोर जामदार व ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी गटाने एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडलेली नाही. महासभा व स्थायी समितीच्या माध्यमातून पालिकेच्या कारभारावर वरचष्मा ठेवण्यातून हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. या संघर्षात महापौर विवेक कांबळे मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या बेबंदशाहीने काँग्रेस पुरती बदनाम झाली आहे. मिरजेच्या संघर्षात सांगलीतील काँग्रेसच्या नगरसेवकांसह विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची फरफट होत आहे.
महापालिकेत मिरजेतील नगरसेवकांनी नेहमीच वर्चस्व गाजविले आहे. पण कधी त्यांच्यात संघर्ष झाला नव्हता. यंदा मात्र मिरजेतील नगरसेवकांतून संघर्षाची ठिणगी पडली आहे. चार महिन्यांपूर्वी महापौर विवेक कांबळे, स्थायी समिती सभापती संजय मेंढे व गटनेते किशोर जामदार यांच्यात उघड संघर्ष झाला होता. महासभेत ऐनवेळचे ठराव घुसडण्यात आल्याने जामदार गटाने महापौरांना कोंडीत पकडले. त्यावर महापौरांनी पलटवार करीत जामदार व मेंढे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. अखेर काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर सुरळीत कारभार होईल, असे वाटले, पण आता पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली आहे. यावेळीही निमित्त आहे, ऐनवेळचा ठराव! वित्त आयोगाच्या साडेचौदा कोटीच्या निधी वाटपाचा ठरावही असाच घुसडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावरून पुन्हा महापालिकेत वादळ उठले आहे. हा विषय राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी चव्हाट्यावर आणला. पण त्यांना किशोर जामदार गटानेच रसद पुरविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
आवटी यांच्या सांगण्यावरून वित्त आयोगातील तीन कोटी रुपये घरकुल योजनेला वर्ग केल्याची चर्चा आहे. हाच मुद्दा आता कळीचा ठरू लागला आहे. महापौर कांबळे हे आवटींच्या इशाऱ्यावर ठराव घुसडतात. काँग्रेसमधील काही नगरसेवक त्यांच्याकडे आहेत, तर जामदारांचा स्वतंत्र गट आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत एलईडी दिव्यांच्या ठेक्याला आवटींनी आक्षेप घेतला होता. हा ठेका जामदार गटाशी निगडित ठेकेदाराकडे आहे. त्यामुळे जामदार गटाने आवटींवर निशाणा साधताना, महापौरांना कोंडीत पकडल्याचे बोलले जात आहे.
जामदार-आवटी गटाच्या संघर्षात केवळ सत्ताधारी काँग्रेसच्याच नव्हे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचीही फरफट होत आहे. विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडीतील नगरसेवकही या दोन गटात विभागले आहेत. या विरोधी नगरसेवकांना दोन्ही गटाकडून रसद दिली जाते.
त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. पण यात सर्वाधिक बदनामी सत्ताधारी काँग्रेसचीच होत आहे, याचे भान मात्र कोणालाच राहत नाही.
सर्वच पक्षांच्या नगरसेवकांत गट-तट
महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडी असे पक्ष असले तरी, आता पक्षाऐवजी नगरसेवकांची ओळख हा अमुक गटात, तो तमुक गटाचा अशी बनत आहे. काँग्रेसमध्ये जामदार व महापौर अशी दोन संस्थाने आहेत. त्यात इद्रिस नायकवडी यांचा स्वतंत्र गट आहे. राष्ट्रवादीतील काही नगरसेवकही या दोन गटात विभागले आहेत. काही महापौरांच्या इशाऱ्याने, तर काही जामदारांच्या इशाऱ्यावर काम करतात. स्वाभिमानीतील एक गट महापौरांच्या बाजूने आहे. सांगलीतील काँग्रेसचे बरेच नगरसेवक कधी जामदारांकडे, तर कधी महापौरांकडे असतात.
महापौर कांबळे यांनी पदभार हाती घेताच, ऐनवेळचा एकही ठराव घेणार नाही, असे जाहीर केले होते. पण आता त्यांना त्याचा विसर पडल्याचे दिसते. सभागृहात कोणतीही चर्चा न करता इतिवृत्तात ऐनवेळचे ठराव घुसडले जात आहेत. त्याची साधी कल्पनाही सत्ताधारी सदस्यांना नसते. महापौरांच्या कार्यालयात ऊठबस करणाऱ्या दोन-चार नगरसेवकांच्या इशाऱ्यावर कारभार सुरू आहे.