काँग्रेसची नाराजी राष्ट्रवादीकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:15+5:302021-06-10T04:19:15+5:30

सांगली : चार महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेत सत्तांतर घडविले खरे; पण आता आघाडीतच खटके उडू लागले ...

Congress ousted by NCP | काँग्रेसची नाराजी राष्ट्रवादीकडून बेदखल

काँग्रेसची नाराजी राष्ट्रवादीकडून बेदखल

सांगली : चार महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेत सत्तांतर घडविले खरे; पण आता आघाडीतच खटके उडू लागले आहेत. काँग्रेसला विश्वासात न घेताच परस्परच राष्ट्रवादीचा कारभार सुरू असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी नाराजीला वाट करून दिली; पण या नाराजीची दखल राष्ट्रवादीकडून अद्यापही घेतलेली नाही. उलट सारे काही आलबेल असल्याचे सांगत काँग्रेस नगरसेवकांची नाराजी बेदखल केली आहे.

महापालिकेत संख्याबळाने सर्वांत छोटा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने फोडाफोडीच्या जोरावर महापौरपद मिळविले, तर आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला उपमहापौरपद आले. कोरोनाच्या काळात महापालिकेत सत्तांतर झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यात पुन्हा सत्तेत आल्याचा आनंद आघाडीतील नगरसेवकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता; पण हा आनंद अल्पजीवी ठरला. चार महिन्यांतच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे.

काँग्रेस नगरसेवकांनी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासमोर तक्रारीचे गाऱ्हाणे मांडले. राष्ट्रवादीकडून महासभेत परस्परच ठराव केले जात आहेत. ठरावाची माहितीही कुणाला दिली जात नाही. गटनेते, उपमहापौरांनाही विश्वासात घेतले जात नाही. एकांगी कारभार सुरू आहे, अशा शब्दांत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. विश्वजित कदम यांनीही सर्व नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही अजून काँग्रेस नगरसेवकांची नाराजी दूर झालेली नाही.

दरम्यान, या नाराज नगरसेवकांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करीत राष्ट्रवादीने त्यांना बेदखल ठरविले आहे. राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिकारी अथवा महापालिकेचा कारभार हाकणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांनी काँग्रेस नगरसेवकांशी साधी चर्चा करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. त्यामुळे आघाडीतील हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

चौकट

नाराजीबद्दल माहितीच नाही : महापौर

काँग्रेस नगरसेवकांची बैठक, त्यांची नाराजी याबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना विचारता त्यांनी अशी बैठक झाल्याचेच आपणाला माहीत नसल्याचे सांगितले. मी सदैव नगरसेवक, जनतेसाठी उपलब्ध असतो. नाराजी असेल तर नगरसेवकांनी माझ्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. काँग्रेस अथवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही नाराजीबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. तसेच काँग्रेसने बैठकीला बोलाविले असते तरी आपण गेलो असतो. त्यांच्या शंकांचे समोरासमोर निरसन केले असते. काँग्रेसचे उपमहापौर, गटनेत्यांना बरोबर घेऊनच आपण महापालिकेचा कारभार करीत आहोत, असे सांगितले.

चौकट

नेतेमंडळी चर्चा करतील : उत्तम साखळकर

काँग्रेस नगरसेवकांच्या काही तक्रारी होत्या. त्या मंत्री विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या समोर मांडल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीची नेतेमंडळी एकत्रित चर्चा करून नगरसेवकांचे प्रश्न सोडवतील, असे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी सांगितले.

Web Title: Congress ousted by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.