आरसीएच कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीला काँग्रेसचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:44+5:302021-06-11T04:18:44+5:30
सांगली : महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (आरसीएच) कडील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीला काँग्रेसने विरोध केला आहे. नगरसेवक फिरोज पठाण ...

आरसीएच कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीला काँग्रेसचा विरोध
सांगली : महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (आरसीएच) कडील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीला काँग्रेसने विरोध केला आहे. नगरसेवक फिरोज पठाण यांनी याबाबत नगरसचिवांना पत्र दिले असून, या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ८ टक्के पगारवाढ दिली जात असताना पुन्हा भरमसाठ वाढ कशासाठी, असा सवाल करून महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड टाकणारा हा ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.
याबाबत पठाण म्हणाले की, एप्रिल महिन्याच्या महासभेत आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा विषय आला होता. या विषयात महापौरांनी आरसीएच कर्मचाऱ्यांना मानधनवाढीचा विषय घुसवला. मूळ विषयात १० लाख १० हजारांचे मानधन वाढ होणार होती; पण ठराव मात्र २ कोटी १६ लाख रुपये वाढीचा करण्यात आला आहे. आरसीएच कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत प्रशासनाकडून कसलेही विषयपत्र आलेले नाही. मुख्य लेखापरीक्षक, लेखाधिकाऱ्यांचा अहवाल नाही. आर्थिक तरतुदीचाही पत्ता नाही. आयुक्त, उपायुक्तांची प्रशासकीय मान्यता नाही. केवळ उपसूचनेद्वारे हा ठराव दुसऱ्याच विषयात घुसवून महापालिकेला कोट्यवधी रुपयांना खड्ड्यात घातले जात आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ८ टक्के मानधनवाढ देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानंतर २०१७ मध्येही त्यांच्या मानधनात वाढ केली होती. २०१९ मध्ये पुन्हा मानधनवाढीचा विषय आला होता. तो प्रलंबित ठेवला होता. आता उपसूचनेद्वारे मानधनवाढीचा ठराव केला आहे. तो महापालिकेच्या आर्थिक नुकसानीचा असल्याने तत्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.