कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा टक्का गेला कुठे?
By Admin | Updated: October 20, 2014 22:34 IST2014-10-20T22:14:10+5:302014-10-20T22:34:04+5:30
विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीला ४ टक्के, कॉँग्रेसला २५ टक्के मतदान

कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा टक्का गेला कुठे?
अविनाश कोळी -सांगली -राष्ट्रवादी आणि भाजपच्या छुप्या पाठिंब्याची उघड चर्चा आता सांगली जिल्ह्यात रंगली आहे. कॉँग्रेस नेत्यांनी याबाबत उघड टीका केली आहे. या टीकेला आता आकड्यांचा आधारही लाभताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे तब्बल १८ नगरसेवक असतानाही सांगली, मिरज मतदारसंघात मिळून राष्ट्रवादीला सरासरी केवळ चार टक्के मतदान मिळाले आहे. ज्या चार मतदारसंघात राष्ट्रवादीवर भाजपला मदत केल्याचा आरोप होत आहे, त्या सांगली, मिरज, जत, पलूस-कडेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीला पडलेल्या मतांची सरासरी ही केवळ साडेसहा टक्के इतकीच आहे. त्यामुळे संशयाला आता अधिक बळ मिळत आहे.
सांगली जिल्ह्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देत भाजपने चार जागा मिळविल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यामध्ये कुठेही भाजपचे फारसे अस्तित्व नसताना अचानक भाजपची ताकद वाढण्यामागे कोणते कारण असावे, याचे कोडे आता राजकीय तज्ज्ञांनाही पडले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी ग्रामीणसह शहरी भागातील अशा संस्थांमध्ये क्रमांक एकवर मानली जात आहे. कॉँग्रेसचेही जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात प्राबल्य आहे. तरीही या दोन्ही पक्षांची वाताहत करून भाजपने कोणत्या शक्तीच्या आधारावर मुसंडी मारली, हा प्रश्नही आता अनेकांना सतावत आहे. निकालाचे आकडे बाहेर पडल्यानंतर अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले. यात सर्वात आश्चर्यकारक आकडे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे होते. माजी मंत्री जयंत पाटील यांना सर्वाधिक ६३ टक्के, तर आर. आर. पाटील यांना ५३ टक्के मते मिळाली. उर्वरित सहा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या मतांची सरासरी केवळ १४ टक्के इतकी आहे. पलूस-कडेगावमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेखा लाड यांना केवळ ०.३७ टक्के मते मिळाली.
सांगली, मिरज मतदारसंघांचा विचार केला तर, या दोन्ही शहरात मिळून राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अपक्ष ६ नगरसेवकांची ताकद आहे. म्हणजे २४ नगरसेवकांची ताकद असूनही राष्ट्रवादीची मते गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली शहरातही राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. तरीही त्यांचे उमेदवार सुरेश पाटील यांना २ टक्केच मते मिळू शकली. पक्षाची प्रत्यक्ष ताकद आणि विधानसभेच्या त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते यांचा ताळेबंद जुळत नाही. मोठी तफावत या आकड्यांमध्ये दिसून येत आहे. भाजपला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या छुप्या मदतीच्या टीकेला आता बळ मिळू लागले आहे.
काँग्रेसची अवस्थाही तशीच आहे. काँग्रेस सांगली, मिरज मतदारसंघात एकसंधपणे लढली नसल्याचे चित्र दिसत आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या मतांची सरासरी २५ टक्के आहे. मिरजेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची संख्या अधिक असतानाही याठिकाणी केवळ १६ टक्के मतेच काँग्रेसच्या पदरात पडली आहेत.
विधानसभानिहाय राष्ट्रवादीचा टक्का
सांगली २.४३
मिरज ५.९५
पलूस-कडेगाव ०.३७
जत १७.९७
खानापूर १८.३७
शिराळा ३७.६७
तासगाव ५३.११
इस्लामपूर ६२.९१