काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी फिस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:06+5:302021-02-05T07:30:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या आगामी महापौर निवडीवरून विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. काँग्रेसला विश्वासात ...

Congress-NCP talks fizzled out | काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी फिस्कटली

काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी फिस्कटली

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या आगामी महापौर निवडीवरून विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. काँग्रेसला विश्वासात न घेताच राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने आधीच नाराजीचा सूर होता. त्यात काँग्रेसनेही महापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नगरसेवकांची सांगलीत बैठकही झाली. दोन्ही पक्ष निवडणुकीवर ठाम राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण, गेल्या अडीच वर्षातील कारभारावर भाजपचे काही नगरसेवक नाराज आहेत. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी गटनेता निवडीच्या निमित्ताने बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यांच्यासोबत चार ते पाच नगरसेवक असल्याचा दावाही केला जात आहे. महापालिकेत बहुमतासाठी विरोधकांना चार नगरसेवकांची गरज आहे. या नाराज नगरसेवकांना सोबत घेऊन महापालिकेत सत्तांतर घडविण्याचे मनसुबे काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आखले जात आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांनीही पडद्याआड हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

त्यातच राष्ट्रवादीने गेल्या दोन महिन्यांपासून महापौरपदाच्या निवडणुकीची तयारी चालविली आहे. पण, मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र राष्ट्रवादीने डावलल्याची भावना तयार झाली होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण यांच्यासह मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादीने महापौरपदावर दावा केला. त्याला काँग्रेसनेही विरोध केला. महापालिकेत काँग्रेसचे २० नगरसेवक असल्याने महापौरपदाची निवडणूक आम्हीच लढणार, अशी भूमिकाही घेतली, तर पालकमंत्री जयंत पाटील यांचे पाठबळ मिळणार असल्याने राष्ट्रवादीने महापौरपदाची, तर काँग्रेसने उपमहापौरपदाची निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही ठेवला. पण, हा प्रस्तावही काँग्रेसच्या नगरसेवकांनी फेटाळून लावला. अखेर याबाबतचा फैसला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर सोपवून बैठक आटोपती घेण्यात आली. बहुमत नसतानाही महापौरपदाच्या उमेदवारीवरून विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादीत मात्र धुसफूस सुरू झाली आहे.

चौकट

भाजपच्या नाराजांवर भीस्त

महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. उपमहापौरांसह चार ते पाच नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेत. या नाराजांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची भीस्त आहे. या नगरसेवकांनी महाआघाडीच्या सत्ताकाळात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काम केले आहे. त्यामुळे त्यांचा जयंतरावांशी थेट संपर्क आहे. मध्यंतरी स्थायी सभापती निवडीवेळीही भाजपच्या नगरसेवकांनी जयंतरावांची भेट घेतली होती. पण, त्यांनी सभापती निवडीबाबत फारशी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे आता महापौर निवडीवेळी तरी जयंतराव लक्ष घालणार का? असा प्रश्न काही नगरसेवकांना पडला आहे.

Web Title: Congress-NCP talks fizzled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.