काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिराळ्यात हल्लाबोल
By Admin | Updated: December 17, 2015 01:22 IST2015-12-17T00:10:41+5:302015-12-17T01:22:30+5:30
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : तालुक्यातील व्यापार बंद; शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष केल्याची टीका

काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिराळ्यात हल्लाबोल
शिराळा : शिराळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह वाकुर्डे योजना, गिरजवडे मध्यम प्रकल्पासाठी निधी द्यावा, दुष्काळाच्या सर्व सवलती मिळाव्यात, जलयुक्त शिवार अभियानात शिराळा-वाळवा तालुक्यांचा समावेश करावा, यासाठी बुधवारी शिराळा तहसील कार्यालयावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्यावतीने मोर्चा काढून हल्लाबोल करण्यात आला. हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुका बंद ठेवण्यात आला. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रीय कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले की, शिराळा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, शासन दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास रास्ता रोको, चक्का जाम असे तीव्र आंदोलन उभे करू. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन, शासनास जाग आणू. आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी शिराळा शहरासह तालुक्यात व्यापार बंद ठेवण्यात आला होता. अंबामाता मंदिरापासून निघालेला हा शेतकरी मोर्चा सोमवार पेठ, गुरुवार पेठ, मेनरोड, एसटी बसस्थानकमार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी नाईक म्हणाले की, हे शासन ऊस लावू नका, पिके घेऊ नका, असे परिपत्रक काढून शेतकरी वर्गाला भीती दाखवत आहे. यंदा खरीप, रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलाव, मध्यम प्रकल्प कोरडे पडत आहेत. तालुक्यात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला आहे, तोही वेळेवर पडलेला नाही. त्यामुळे शासनाच्या निकषात दुष्काळ बसतो. आम्ही या निकषाप्रमाणेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहोत.
गिरजवडे प्रकल्प लोकप्रतिनिधींनी बंद पाडला आहे. शासन पुरवणी मागणीवेळी २० हजार कोटींचा निधी मंजूर करते, मग दुष्काळासाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात काय अडचण आहे? दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
सत्यजित देशमुख म्हणाले की, ५४ गावांची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी असताना, प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा न केल्याने येथील शेतकरी वर्गाची हेळसांड होत आहे. लोकप्रतिनिधी समन्वय समितीची बैठक घेतात. यात दुष्काळाची चर्चाच होत नाही. आता मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.
यावेळी विजयराव नलवडे, के. डी. पाटील, डॉ. उषाताई दशवंत, महादेव कदम, नारायण चव्हाण, प्रतापराव यादव, संभाजी नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अॅड. भगतसिंग नाईक, पंचायत समिती सभापती चंद्रकांत पाटील, उपसभापती सम्राट नाईक, सुनीता नाईक, सुरेश चव्हाण, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, विराज नाईक, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, संपतराव शिंदे, अशोकराव पाटील, सरपंच गजानन सोनटक्के, अर्चना कदम उपस्थित होते. स्वागत भीमराव गायकवाड यांनी केले, तर प्रजित यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शासनाने वाकुर्डे योजनेचे १४ लाख रुपये बिल भरण्यास पैसे नाहीत म्हणून जाहीर करावे. विश्वास साखर कारखाना हे बिल भरून शेतकऱ्यांना दिलासा देईल. याची नोंद शासनाने घ्यावी.
- मानसिंगराव नाईक
माजी आमदार
गिरजवडे तलाव, वाकुर्डे योजनेचे काम सुरू नाही. तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी येत नाही तोपर्यंत शेतकरी दररोज तहसील कार्यालयावर येऊन आंदोलन करतील.
- के. डी. पाटील,
माजी जिल्हा परिषद सदस्य
जलयुक्त शिवार योजनेस मोठा निधी मिळतो, मग दुष्काळासाठी का नाही? हे सरकार फक्त वांझोट्या व फसव्या घोषणा करून जनता व शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.
- सत्यजित देशमुख,
राष्ट्रीय कॉँग्रेसचे सरचिटणीस