महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:55+5:302021-02-06T04:47:55+5:30
सांगली : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेतील विरोधी कॉंग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यातच मित्रपक्ष राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलून फिल्डिंग लावली ...

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेसची बैठक
सांगली : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेतील विरोधी कॉंग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यातच मित्रपक्ष राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलून फिल्डिंग लावली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक होत आहे. ग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत २१ फेब्रुवारीला संपणार आहे. नूतन महापौर, उपमहापौर निवडीसाठी प्रशासनाने पुणे विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सत्ताधारी भाजपकडे दोन अपक्षांसह ४३ चे संख्याबळ आहे. तर, विरोधी कॉंग्रेस पक्षाकडे १९ व राष्ट्रवादीकडे १५ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस व राष्ट्रवादीला महापौरपदाचे स्वप्न पडू लागले आहे. भाजपमधील नाराजीचा लाभ उठविण्यासाठी दोन्ही काँग्रेस सरसावली आहे. महापौरपदासाठी कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, मंगेश चव्हाण, अभिजित भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून महापौरपदाची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीत गेल्या पाच दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू झाला आहे.
मित्रपक्षातच महापौरपदाची निवडणूक लढविण्यावरून संघर्ष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर ही बैठक होत आहे. यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक महापौरपदाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. यावर विश्वजित कदम काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर निवडणुकीशिवाय महापालिकेत सुरू असलेल्या विविध कारभारावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.