अग्निशामक जवानांचा काँग्रेसतर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:11+5:302021-02-05T07:31:11+5:30
सांगली : स्टेशन चौकात आग लागलेल्या एका घरातून अग्निशामक दलाच्या जवानांनी एका व्यक्तीला तत्परतेने हालचाली करून वाचविले. या जवानांचा ...

अग्निशामक जवानांचा काँग्रेसतर्फे गौरव
सांगली : स्टेशन चौकात आग लागलेल्या एका घरातून अग्निशामक दलाच्या जवानांनी एका व्यक्तीला तत्परतेने हालचाली करून वाचविले. या जवानांचा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गौरव केला.
स्टेशन चौकातील एका घराला नुकतीच आग लागली होती. त्यात एक व्यक्ती अडकून पडली होती. तिला अग्निशामक दलाच्या विजय पवार, प्रसाद माने, रामचंद्र चव्हाण, रुद्रेश्वर केंगार, रोहित घोरपडे, दत्तात्रय माने, प्रभाकर माळी यांनी तत्परतेने घटनास्थळी जाऊन बाहेर काढले. त्याचे हृदय बंद पडले होते. लगेचच त्यांच्या हृदयाला पंप करून कृत्रिम श्वास दिला आणि त्यांचा जीव वाचविला. सध्या त्यांच्यावर येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी या जवानांना मार्गदर्शन केले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, आगीत अडकलेल्या माणसाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविण्याची महत्त्वाची कामगिरी या जवानांनी केली आहे. त्यांचा मला अभिमान आहे. यावेळी अजित ढोले, पैगंबर शेख, नामदेव पठाडे, मौला वंटमोरे, आशिष चौधरी, अरुण पळसुले, आदी उपस्थित होते.