गुंठेवारी सभापतीसाठी काँग्रेसमध्ये
By Admin | Updated: June 3, 2014 01:24 IST2014-06-03T01:20:18+5:302014-06-03T01:24:15+5:30
चुरस घाडगे, पाटील यांची नावे चर्चेत : ‘मागासवर्गीय’साठी मोर्चेबांधणी

गुंठेवारी सभापतीसाठी काँग्रेसमध्ये
सांगली : महापालिकेच्या गुंठेवारी समिती, मागासवर्गीय समितीसह चार प्रभाग सभापती पदांसाठी सत्ताधारी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषत: गुंठेवारी समितीच्या सभापतीपदासाठी इच्छुकांनी नेत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. या पदासाठी विजय घाडगे, दिलीप पाटील, प्रशांत पाटील यांची नावे चर्चेत आहेत, तर मागासवर्गीय समिती सभापतीपदी महिलेला संधी मिळण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून वर्तविली जात आहे. विद्यमान प्रभाग सभापतींनी मुदतवाढीही प्रयत्न चालविले आहेत. गुंठेवारी, मागासवर्गीय समितीसह चार प्रभाग सभापतींच्या निवडी ६ जूनरोजी होत आहे. त्यासाठी ५ जूनरोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. गुंठेवारी समितीत काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे पाच व स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य आहेत. काँग्रेसमधून विजय घाडगे, दिलीप पाटील, प्रशांत पाटील यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत. याशिवाय मिरजेतून बबीता संजय मेंढे यांना संधी देण्याची मागणी होत आहे. मागासवर्गीय समितीत काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीचे चार व स्वाभिमानीचा एक सदस्य आहे. समितीत काँग्रेसमध्ये शेवंता वाघमारे व बसवेश्वर सातपुते यांची नावे चर्चेत आहेत. चार प्रभाग समित्यांपैकी तीन समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. प्रभाग समिती दोनमध्ये विरोधी राष्ट्रवादी व भाजप एकत्र आल्याने गतवेळी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. नव्या सभापती निवडीत काँग्रेसने प्रभाग दोनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, तर अन्य तीन सभापतींनी मुदतवाढीची मागणी केली आहे. या सभापतींना अवघा तीन महिन्यांचा कार्यकाळ मिळाला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा नेत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केल्याने प्रभाग सभापतीसाठी चुरस वाढली आहे. त्यात मदन पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)