मिरज तालुक्यात पराभवामुळे काँग्रेसला मरगळ
By Admin | Updated: December 1, 2014 00:14 IST2014-11-30T22:14:05+5:302014-12-01T00:14:41+5:30
पुन्हा अस्तित्वाची लढाई : सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकांत रंगणार

मिरज तालुक्यात पराभवामुळे काँग्रेसला मरगळ
प्रवीण जगताप- लिंगनूर -मिरज तालुक्यातील कॉँग्रेसला सलग लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने, कॉँग्रेस कार्यकर्त्यांत निराशाजनक वातावरण आहे. मोठ्या मताधिक्याने भाजपला जनतेने कौल दिल्याने, आता पुन्हा आगामी येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या निवडणुकांत तरी कॉँग्रेसला ‘अच्छे दिन’ मिरज तालुक्यात पाहावयास मिळतील का? असा प्रश्न आहे. त्यामुळे गावा-गावात आगामी सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुकांत अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.
मिरज तालुका तसा वसंतदादांचा तालुका म्हणून ओळखला जातो. पण मागील दोन निवडणुकांतील स्थिती पाहिली, तर कॉँग्रेससाठी सध्या ‘बुरे दिन’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना साठ हजारावर मताधिक्य मिळाल्याने, कॉँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यातच राष्ट्रवादीही सोबत नसल्याने, येणाऱ्या सर्वच निवडणुकीत नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.
नजीकच्या काळात कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पुनर्बांधणी करून जोमाने कामाला लागावे लागणार आहे. अन्यथा भाजपचे कार्यकर्ते विजयाचा ‘टेंपो’ पुढेच रेटण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे आजतागायत सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतंत्रपणे न उतरणारा पक्ष व कार्यकर्ते नेटाने उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुका सर्वच पक्षांसाठी मोठ्या अस्तित्वाच्या लढाया ठरणार आहेत. आता या निवडणुकांत मात्र कार्यकर्त्यांमधील ‘दूध का दूध और पानी का पानी ’ हे स्पष्ट होणार आहे.
कारण विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी अचानक काडीमोड घेतल्याने स्थानिक नेत्यांच्याही भूमिका अचानक बदलल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उमेदवारांनाही कोणते कार्यकर्ते कोणाचे काम करीत होते, याचा अंदाज अद्याप बांधता आलेला नाही.
अशातच मिरज विधानसभेसाठी तर पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस नेते बाळासाहेब होनमोरे अचानक राष्ट्रवादीतून उभे राहिले. सी. आर. सांगलीकर यांनी पंचायत समितीची फळी सोबत घेऊन बंडखोरी केली, तर सिद्धार्थ जाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळूनही खडतर प्रवास करावा लागला.
अर्थात केंद्रापासून राज्यापर्यंत पोषक वातावरण आणि स्थानिक कॉँग्रेसमध्ये फुटीने आलेला कमकुवतपणा भाजपच्या चांगलाच कामाला आला अन् मोठे मताधिक्य मिळाले. भाजपला मिरज मतदारसंघात ‘लाल दिवा’ मिळालाच, तर मोठ्या ताकदीने सर्वच निवडणुकांत भाजपचे कार्यकर्ते नेटाने सामोरे गेल्यास आश्चर्य वाटायला नको. तेव्हा कॉँग्रेसला आता खडतर काळ सुरू आहे. हा खडतर काळ नष्ट हाईल का? कॉँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येतील का? पक्षाचे नेते या पराभवातून धडा घेऊन कार्यरत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
घोरपडे-खाडे यांनी पक्की मोट बांधली तर..?
मिरज पूर्व भागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. निवडणुकीत घोरपडे जरी भाजपध्ये गेले तरी, स्थानिक नेते राष्ट्रवादीतच, असे उसने अवसान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी आणले होते. पण ते अवसान निवडणुकांच्या निकालावरून गळून पडल्याचेच दिसून आले. शिवाय अचानक कॉँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या उमेदवारासोबत राहण्यापेक्षा अंतिमक्षणी गावा-गावातल्या कार्यकर्त्यांनी भाजपला पसंती दिली. त्यामुळे घोरपडे व खाडे गटातील तथाकथित संघर्ष निवडणुकीच्या निकालात शमला (?) असल्याचेच दिसून आले. ते एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेल्यास मात्र पुन्हा कॉँग्रेसची वाट बिकट होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.