काँग्रेस नगरसेवकांची २१ ला बैठक
By Admin | Updated: January 13, 2016 23:28 IST2016-01-13T23:28:30+5:302016-01-13T23:28:30+5:30
महापौर निवड : पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील यांची उपस्थिती

काँग्रेस नगरसेवकांची २१ ला बैठक
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांची विस्कटलेली घडी आणि महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ रोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला आमदार पतंगराव कदम, जयश्रीताई मदन पाटील व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत.
तत्कालीन सांगली नगरपालिका व आताच्या महापालिकेवर मदन पाटील यांचे वर्चस्व होते. त्यांचा शब्द महापालिकेत अंतिम मानला जात होता. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, तसेच प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात मदनभाऊंचा सहभाग असे. गतवेळी महापालिकेची निवडणूक काँग्रेसच्या झेंड्याखाली झाली. मदनभाऊ, पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनी एकत्रित निवडणूक लढवित सत्ता खेचून आणली होती. सत्तेत कदम पिता-पुत्रांचा मोलाचा वाटा असला तरी, त्यांनी कधी पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मदनभाऊंकडे होते.
पण आता मदनभाऊंच्या निधनानंतर पालिकेतील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. कधीकाळी एकसंध वाटणाऱ्या काँग्रेसला दुफळीचे ग्रहण लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापौर निवडीसाठी आतापासून गटा-तटाचे राजकारण खेळले जात आहे. नेताच नसल्याने सत्ताधारी गट सैरभैर झाला आहे. तरीही मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसमधील छुपा संघर्ष, नगरसेवकांच्या वाढलेल्या अपेक्षा, पदाधिकाऱ्यांबद्दल असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकसंध ठेवण्यासाठी पतंगराव कदम, विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील यांनी २१ जानेवारी रोजी नगरसेवकांची बैठक बोलाविली आहे. ही बैठक नेमकी कोठे होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण बैठक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी महापौर निवडीवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
जेवणावळी सुरू
महापौर पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ज्येष्ठ नगरसेवकांसह पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनाही महापौर पदाचे डोहाळे लागले आहेत. बुधवारी कुपवाडमधील एका नगरसेवकाने जेवणाचा बेत आखला होता. या जेवणाला अनेक नगरसेवकांनी हजेरी लावली होती. भोजनावळींना आतापासूनच सुरुवात झाली आहे.