गटनेता बदलण्याची काँग्रेस नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:03+5:302021-02-07T04:24:03+5:30

सांगली : महापालिका निवडणुकीनंतर पक्षीय नेते व नगरसेवकांच्या बैठकीत यापूर्वीच सव्वा वर्षांकरिता गटनेता निवडण्यात येईल, असे ठरले होते. आता ...

Congress corporators demand change of group leader | गटनेता बदलण्याची काँग्रेस नगरसेवकांची मागणी

गटनेता बदलण्याची काँग्रेस नगरसेवकांची मागणी

सांगली : महापालिका निवडणुकीनंतर पक्षीय नेते व नगरसेवकांच्या बैठकीत यापूर्वीच सव्वा वर्षांकरिता गटनेता निवडण्यात येईल, असे ठरले होते. आता हा कालावधी संपला तरी गटनेता का बदलत नाही? असा सवाल काही काँग्रेस नगरसेवकांनी शनिवारी सांगलीतील बैठकीत केला.

येथील काँग्रेस भवनात शनिवारी सकाळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत महापालिकेची बैठक पार पडली. या बैठकीत विशाल पाटील गटाच्या नगरसेवकांनी गटनेता बदलाचा मुद्दा उपस्थित केला. वहिदा नायकवडी म्हणाल्या की, पक्षात एखाद्या पदावर इतरांनाही संधी मिळायला हवी. गटनेता म्हणून उत्तम साखळकर यांची निवड करताना यापूर्वीच सव्वा वर्षांचा कालावधी निश्चित झाला होता. आता ठरल्याप्रमाणे गटनेते पदावर इतरांना संधी द्यावी. पक्षाच्या नेत्यांनी कोणतेही नाव ठरवावे. त्यास आमचा पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे मत मांडण्यात आले तेव्हा विश्वजित कदम उपस्थित नव्हते. त्यामुळे नेत्यांनी याबाबत कदम यांच्यासमोर हा मुद्दा आम्ही मांडू, असे स्पष्ट केले. प्रत्यक्षात या विषयावर कोणताही निर्णय झाला नाही.

गटनेता बदलाबरोबरच महापौरपदाची निवडणूक काँग्रेसने ताकदीने लढविण्यासाठी तयारी करण्याची गरज असल्याची बाब काँग्रेस नगरसेवकांनी मांडली. कदम यांनी याबाबत तयारी करण्याचे आदेश दिले. ही निवडणूक कशी लढवावी, याबाबतही सर्वांची मते विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. काही नगरसेवकांनी आघाडी केल्यास पद आपल्याकडेच असावे, असे सूचविले.

चौकट

एकसंधपणे काम करावे

कदम म्हणाले की, महापालिकेतील नगरसेवकांनी एकसंधपणे काम करावे. आगामी निवडणुकीसाठी आतापासून प्रयत्न करायला हवेत. भविष्यात महापालिका पुन्हा काँग्रेसकडे कशी येईल, याचा विचार करावा, असे आवाहन केले.

चौकट

विकासकामांबाबत लवकरच बैठक

पृथ्वीराज पाटील म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळावा. अल्पसंख्याकासाठी असलेल्या योजनांबाबतही प्रस्तावांना मंजुरी मिळावी. यावर कदम म्हणाले की, सर्व प्रस्ताव तयार करावेत. त्यावर मुंबईत तातडीने नगरविकास व अन्य मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन याबाबत तातडीने निर्णय घेतले जातील.

Web Title: Congress corporators demand change of group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.