काँग्रेस नगरसेवकाने घेतले महापौरांना फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST2021-04-06T04:26:09+5:302021-04-06T04:26:09+5:30

सांगली : राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे विरोधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रभागात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक ...

Congress corporator took over the mayoral post | काँग्रेस नगरसेवकाने घेतले महापौरांना फैलावर

काँग्रेस नगरसेवकाने घेतले महापौरांना फैलावर

सांगली : राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे विरोधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रभागात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी केला. यावरून महापौर दालनात चांगलाच वाद रंगला होता. चव्हाण यांनी महापौरांना फैलावर घेत महापालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे, हे भान विसरू नका, असा सज्जड दमही भरला.

महापालिकेच्या प्रभाग १५ मध्ये काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले मंगेश चव्हाण यांच्या प्रभागात गेल्या काही दिवसांपासून महापौर सूर्यवंशी यांनी विरोधकांना हाताशी धरून हस्तक्षेप सुरू केला होता. याच प्रभागातील आदित्य डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई करण्यात आली. तेव्हाही महापौर सूर्यवंशी हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कारवाईस्थळी गेले होते. वास्तविक महापौरांनी वाॅर्डातील एकाही नगरसेवकाला घटनेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे चव्हाण यांच्यासह सर्वच नगरसेवक नाराज झाले होते.

त्यात सोमवारी महापौर सूर्यवंशी यांनी प्रभाग १५ मधील आरोग्य समस्यांबाबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीबाबत प्रभागातील चारही नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते. परस्परच बैठक लावण्यात आली होती. तर महापौरांच्या दालनातील बैठकीला भाजपचे प्रतिनिधी मात्र उपस्थित होते. बैठकीची कुणकुण लागताच मंगेश चव्हाण यांच्यासह चारही नगरसेवक हजर झाले. त्यांनी महापौरांना धारेवर धरले. प्रभागातील विषय असताना तेथील नगरसेवकांना का बोलाविले नाही, असा जाब विचारला. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकला. त्याचे भान तरी ठेवावे. आघाडीच्या विरोधातील प्रतिस्पर्ध्याला सहकार्य करण्याची महापौरांची भूमिका चुकीची आहे. त्यात बदल न केल्यास महापौरांनाही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. त्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला होता. अखेर चव्हाण व इतर नगरसेवकांचा पारा चढल्याने महापौरांनी आरोग्य विभागाची बैठक आटोपती घेतली.

Web Title: Congress corporator took over the mayoral post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.