गटबाजीमुळे काँग्रेसला फटका

By Admin | Updated: October 23, 2014 00:05 IST2014-10-22T22:17:20+5:302014-10-23T00:05:46+5:30

विधानसभा निवडणूक : महापालिका निवडणुकीपेक्षा कमी मते

Congress blows due to grouping | गटबाजीमुळे काँग्रेसला फटका

गटबाजीमुळे काँग्रेसला फटका

सांगली : पक्षांतर्गत गटबाजी, बंडखोरीचे लागलेले ग्रहण आणि छुप्या कुरघोड्यांनी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली एकूण मते व त्यांची टक्केवारी पाहता, विधानसभा निवडणुकीत यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पक्षांतर्गत गटबाजीने डोके वर काढले होते. दिगंबर जाधव यांनी बंडखोरीचे संकेत दिले. त्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनीही बंडखोरी केली. उघडपणे बंडखोरीचा झेंडा एकीकडे फडकविला जात असतानाच, पक्षांतर्गत एकत्र दिसणाऱ्या नेत्यांमधील सूर जुळत नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. महापालिका निवडणुकीत कदम व दादा घराण्याने एकसंधपणे ताकद लावल्यामुळे जयंत पाटील यांच्या हातून महापालिकेची सत्ता पुन्हा काँग्रेसने काबीज केली. लोकसभा निवडणुकीत पुन्हा बंडखोरी आणि नेत्यांमधील एकसंधपणाची उणीव दिसून आली. मोदी लाटेचा फटका काँग्रेसला बसतानाच अन्य कारणांमुळेही पक्षाची पीछेहाट झाली. यामध्ये राष्ट्रवादीने केलेला विरोधी प्रचार, पक्षांतर्गत संघर्ष या गोष्टींचा समावेश होता.
विधानसभा निवडणुकीत पक्षापेक्षा मदन पाटील समर्थकच एकसंधपणे लढत होते. पक्षापेक्षा मदन पाटील समर्थकांचे अस्तित्व ठळकपणे दिसत होते. बंडखोरीला तोंड देत या समर्थकांनी एकहाती किल्ला लढविला. बंडखोरांमुळे मोठी मतविभागणी होईल, ही शंका त्यांनी खोटी ठरवली. बंडखोरांना कमी मते मिळाली असली तरी, पक्ष आणि पक्षाचे नेते म्हणून काम करणाऱ्यांमध्ये कुठेही सुसूत्रता दिसून आली नाही. ऐन विधानसभा निवडणुकीतच माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पतंगराव कदम यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उमेदवारी निश्चित करण्यावरून तसेच रणनीती ठरविण्यावरून नेत्यांचे सूर बिघडले होते, हे यावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच विजयासाठी आवश्यक असलेली फिगर गाठणे काँग्रेसला शक्य झाले नाही.
सांगली शहरापेक्षा मिरजेत काँग्रेसअंतर्गत गोंधळ मोठा होता. याठिकाणचे अनेक नगरसेवक सांगलीकरांच्या प्रचारासाठी धडपडत होते. पक्षाच्या उमेदवाराकडील यंत्रणा कमी पडत होती. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर गेला असला तरी, याठिकाणी यश मिळविणे काँग्रेसला अवघड नव्हते. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच अधिकृत उमेदवारांना फटका बसल्याचे स्पष्टपणे आता दिसून येत आहे. काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे व गटबाजीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला विरोधी उमेदवारांपेक्षा स्वकीयांपासूनच अधिक धोका वाटत आला आहे. त्यामुळे उमेदवारांची बरीचशी शक्ती या गोष्टी रोखण्यासाठीच खर्ची पडत आहे. त्याचा फटका प्रत्येकवेळी उमेदवारांना बसत आहे. (प्रतिनिधी)

मदन पाटील यांच्याकडून ६६ हजारांची हॅट्ट्रिक
मदन पाटील यांना गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतांची बेरीज ६६ हजारांच्याच घरात आहेत. २00४ मध्ये जेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांना ६६ हजार ५६३ मते मिळाली होती. २00९ मध्ये ते पराभूत झाले त्यावेळीही त्यांना ६६ हजार २४0 मते मिळाली होती. या निवडणुकीतही त्यांना ६६ हजार ४0 मते मिळाली आहेत. म्हणजेच मदन पाटील यांना प्रत्येकवेळी ६६ हजार मते मिळाली आहेत. त्यांच्या मतात काहीच फरक पडला नाही. नव्याने मतदार खेचण्यात ते कमी पडले असावेत, असाही एक तर्क आता लढविला जात आहे.

एकूण मतांच्या टक्केवारीचा अभ्यास केला तर, सांगलीतून र्कांग्रेसला महापालिका निवडणुकीत ३८.५0 टक्के मतदान झाले होते, तर सांगली विधानसभा मतदारसंघातून ३४ टक्केच मते मदन पाटील यांना पडली. मिरजेतील महापालिकेच्या निवडणुकीतील टक्केवारी आणि विधानसभेची टक्केवारी यात मोठी तफावत आहे.

Web Title: Congress blows due to grouping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.