भ्रष्ट राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला फटका : विश्वजित कदम
By Admin | Updated: November 21, 2014 00:30 IST2014-11-20T22:30:27+5:302014-11-21T00:30:38+5:30
राष्ट्रवादी सत्तेत नको, म्हणून काँग्रेसला अनेक ठिकाणी जनतेने नाकारले.

भ्रष्ट राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला फटका : विश्वजित कदम
कडेगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तरीही आघाडी होणारच, या भावनेतून लोकांनी काँग्रेसलाही फटका दिला. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर सर्वत्र नाराजी होती. राष्ट्रवादी सत्तेत नको, म्हणून काँग्रेसला अनेक ठिकाणी जनतेने नाकारले. भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या मैत्रीची किंमत काँग्रेसला मोजावी लागली, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.
अंबक (ता. कडेगाव) येथील अंबक सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या लाभांश वाटप समारंभात ते बोलत होते. कदम म्हणाले की, राज्यात ७८ ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३७ ठिकाणी १ ते १५ हजारांच्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. राज्यातील २५ जागा वरिष्ठ स्तरावरील कारभारामुळे गेल्या आहेत. संस्थांमध्ये भ्रष्टाचारामुळे सहकार चळवळीला गालबोट लागले आहे. परंतु डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील सर्व संस्थांची आदर्शवत वाटचाल सुरू आहे. जसा नेता तसे कार्यकर्ते, याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही त्यांच्या ताब्यातील गावोगावच्या सहकारी सोसायट्यांचा कारभार आदर्शवत केला आहे, असे कदम यांनी सांगितले.
प्रारंभी अंबक सोसायटीच्या सभासदांना ७ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी सहायक निबंधक अमोलसिंह डफळे, सुनील जगदाळे, विलास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.
जि. प. सदस्य शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, ‘सोनहिरा’चे उपाध्यक्ष निवृत्ती जगदाळे, संचालक आकाराम मेखे, बाळकृष्ण पाटील, वैभव गायकवाड, आकांक्षा तांबेवाघ, एन. एम. जगदाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)