काँग्रेसनेही केला व्यसनमुक्तीचा संकल्प
By Admin | Updated: February 19, 2015 23:37 IST2015-02-19T23:25:37+5:302015-02-19T23:37:48+5:30
आबांना आदरांजली : शोकसभेत दिला आठवणींना उजाळा

काँग्रेसनेही केला व्यसनमुक्तीचा संकल्प
सांगली : राष्ट्रवादीने बुधवारी केलेल्या व्यसनमुक्तीच्या संकल्पापाठोपाठ आज, गुरुवारी काँग्रेस पक्षानेही व्यसनमुक्तीचा संकल्प केला. तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यापुढे स्वत:हून व्यसन सोडावे, अन्यथा पक्षामार्फत त्यांचे प्रबोधन करून व्यसन सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस कमिटीत आज काँग्रेसच्यावतीने शोकसभेचे आयोजन केले होते. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, तंबाखूचे छोटेसे व्यसन आर. आर. पाटील यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या जिवावर बेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे पक्षातील अशा तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांच्या व्यसनमुक्तीतून आपण आबांना आदरांजली वाहण्याची गरज आहे. ज्यांना अशाप्रकारचे व्यसन आहे, त्यांनी ते तातडीने सोडावे. पक्षामार्फतही अशा कार्यकर्त्यांना व्यसनातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातील.
आबांविषयी ते म्हणाले की, आर. आर. यांची जडणघडण काँग्रेसमध्येच झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षानेही नेहमीच आबांकडे आदराने पाहिले. ते सर्वमान्य नेतृत्व होते. त्यांची लोकप्रियता त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या गर्दीतून दिसून आली. काँग्रेस कमिटीमध्ये त्यांना आदरांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे. त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्यासाठी काँग्रेसही प्रयत्नशील राहील.
यावेळी आनंदराव नलावडे, अजित ढोले, राजन पिराळे, दिलीप पाटील, प्रवीण लाड, पैगंबर शेख, देशभूषण पाटील, अशोक पवार, दिलीप पवार, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
बिल क्लिंटन आणि आबा
आबांची एक आठवण सांगताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी निमंत्रितांसाठीच्या भोजनावेळी शरद पवार व आर. आर. पाटील उपस्थित होते. शरद पवारांनी ज्यावेळी आर. आर. पाटील यांच्या संत गाडगेबाबा अभियानाची माहिती दिली, त्यावेळी क्लिंटन यांनी आबांचे कौतुक केले होते.
शोकसभेनंतर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले. याठिकाणी सर्वांनी आर. आर. पाटील यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.