सत्तेची खात्री, पण ‘चमत्कारा’ची भीती
By Admin | Updated: August 4, 2015 23:36 IST2015-08-04T23:36:05+5:302015-08-04T23:36:05+5:30
जयंत पाटील : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीबाबत मत

सत्तेची खात्री, पण ‘चमत्कारा’ची भीती
सांगली : सांगलीच्या बाजार समितीमध्ये आमच्याच पॅनेलची सत्ता येणार, याची खात्री असली तरी, त्यांच्या ‘चमत्कारा’ची भीतीही वाटते, असे मत आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील आर्थिक चमत्काराचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी काही ठिकाणी विशेष चमत्कार घडविले होते. तसे चमत्कार बाजार समितीच्या निवडणुकीत होतील की काय, अशी शंका वाटते. शेवटच्या दोन दिवसातच ते असे चमत्कार करीत असतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे आमचे लक्ष राहील. सहकारी संस्थांच्या बरखास्तीचा जो निर्णय झाला, तो मंत्रिमंडळाशी संबंधित नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय मागे घेण्यास ते तयारच नव्हते. यासंदर्भात आर. आर. पाटील व आपण दोघांनी तक्रार केली होती. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता, तो पुढे रेटला. त्यामुळे संस्था बरखास्तीवेळी आम्ही गप्प बसलो होतो, हे विरोधकांचे विधान चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
कवठेमहांकाळ येथील पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विश्वासात घेतले नाही, म्हणून त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या या भावनेची आम्ही दखल घेतली आहे. त्यासंदर्भात नाराज कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चासुध्दा केली आहे. त्यांची नाराजी दूर होईल. नाराज लोक कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाहीत. तासगाव-कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पक्षीय बळाचे गणित मांडले जात आहे. वास्तविक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर कधीच लढविल्या जात नाहीत. त्यामुळे या निकालावरून आमच्या पक्षाची ताकद कमी झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
भावा-भावात भांडणे होती
आर. आर. पाटील यांना छोटा भाऊ मानणाऱ्या पतंगरावांनी छोट्या भावाचे कार्यकर्ते मोठ्या भावाकडेच येणार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यावर जयंतराव म्हणाले की, ते त्यांना भाऊ मानत असले तरी, भावा-भावात भांडणे होती म्हणून तर दोघे वेगवेगळ्या पक्षात राहिले. त्यामुळे या छोट्या भावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जातील, अशी कोणतीही चिन्हे नाहीत.
आम्ही इतके दुबळे नाही...
जिल्हास्तरीय संस्थांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवे, असे मत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून लढण्याची गरज वाटत नाही. जिल्हास्तरीय निवडणुका त्यांना घेऊन लढविण्याइतपत आम्ही दुबळे नाही.