आत्मविश्वास वाढवणारा ‘सेतू-अभ्यास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:52+5:302021-07-07T04:33:52+5:30
सांगली : पाठ्यपुस्तकांना स्पर्श न करता अभ्यासाची निर्मिती करण्याची संकल्पना अत्यंत चांगली आहे. त्यामुळे ‘सेतू-अभ्यास’ उपक्रम आत्मविश्वास वाढविणारा ठरेल, ...

आत्मविश्वास वाढवणारा ‘सेतू-अभ्यास’
सांगली : पाठ्यपुस्तकांना स्पर्श न करता अभ्यासाची निर्मिती करण्याची संकल्पना अत्यंत चांगली आहे. त्यामुळे ‘सेतू-अभ्यास’ उपक्रम आत्मविश्वास वाढविणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मराठी विषय सहायक डॉ. नंदा भोर यांनी केले.
सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग व सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने 'सेतू-अभ्यास' ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदा भोर व सेतू-अभ्यास समितीचे सदस्य विजय सरगर सहभागी झाले होते. यावेळी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे हेसुद्धा सहभागी झाले होते. स्वागत विठ्ठल मोहिते यांनी केले.
नंदा भोर म्हणाल्या की, हा अभ्यास कल्पनादृष्टीत आहे. पाठ्यपुस्तकांना स्पर्श न करता या अभ्यासाची निर्मिती करण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांना अधिक अभिव्यक्त होता यावे, आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्याचबरोबर मौखिक भाषा विकास साधला जावा आणि वाचन-लेखन कौशल्यही विकसित व्हावे, हा उद्देश आहे.
विष्णू कांबळे म्हणाले की, मातृभाषेसाठी मराठी अध्यापक संघाचे सातत्याने चाललेले प्रयत्न अत्यंत चांगले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्व भाषिक क्षमतांचा विकास साधण्यास व या अभ्यासक्रमाची यशस्वीता वाढवण्यासाठी या मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होईल.
विजय सरगर म्हणाले, कोरोना कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते भरून काढण्याचे काम सेतू-अभ्यासाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये- ‘जाणून घेऊ या’, ‘सक्षम बनू या’, ‘सराव करू या’, ‘कल्पक होऊ या’, अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या कृती आहेत.
प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय वैशाली आडमुठे यांनी करून दिला. आभार जिजाराम पोटे यांनी मानले. संयोजन नाना पवार, बजरंग संकपाळ, रमेश पाटील यांनी केले.