लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर, आष्टा आणि परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने सुरू आहे, तर दुसरीकडे संचारबंदीतही नागरिक अकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांसाठी शहरातील रुग्णालयांत खाटा नाहीत. त्यामुळे हाल होत आहेत, तर आरोग्य विभागाचे नियोजन नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
वाळवा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. तेथेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे तपासणीसाठी नमुने घेतले जात आहेत. रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे; परंतु ग्रामीण रुग्णालये जबाबदारी झटकत आहेत. रुग्णाची व्यवस्था करा, असे सांगितले जात असल्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
शहरात उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर आणि आष्टा येथे शासकीय रुग्णालय एकूण तीन कोविड सेंटर असून, दहा खासगी केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये एकूण १०८१ खाटा असून, यामध्ये खासगी रुग्णालयांतील ९११ खाटांचा समावेश आहे. यापैकी दोन खासगी रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना सुरू आहे. या योजनेतील खाटा भरल्याचे संगितले जाते. त्यामुळे सामान्य रुग्णांचे उपचाराविना हाल होत आहेत.
कोट
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इस्लामपूर व आष्टा या ठिकाणच्या खाटा संपल्या आहेत. रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी इस्लामपुरात खाटा वाढविण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच नवीन दोन कोविड सेंटर उभी राहतील.
- नरसिंह देशमुख, वैद्यकीय अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर
चाैकट
बोरगाव आरोग्य केंद्रात गोंधळ
बोरगाव (ता. वाळवा) येथील आरोग्य केंद्रात कोरोनाबाबतची यंत्रणा तोकडी आहे. तेथे खाटा उपलब्ध नाहीत. रुग्णाचे घशातील स्राव घेतले जातात. यामध्ये आढळून आलेल्या कोरोना रुग्णाची व्यवस्था करण्यास नातेवाइकांना सांगून आरोग्य केंद्र जबाबदारी झटकत आहे.