सांगलीत रुजतेय गणेशमूर्ती दान संकल्पना

By Admin | Updated: September 13, 2016 00:47 IST2016-09-12T23:52:47+5:302016-09-13T00:47:40+5:30

महापालिकेच्या उपक्रमाला यश : तीन दिवसात तीन हजार मूर्ती, ५० टन निर्माल्य दान; कुंडातील विसर्जनालाही प्राधान्य--लोकमत विशेष

Concept of Ganesh idol | सांगलीत रुजतेय गणेशमूर्ती दान संकल्पना

सांगलीत रुजतेय गणेशमूर्ती दान संकल्पना

सांगली : कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य दान मोहिमेला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एक हजार गणेशमूर्ती जास्त प्राप्त झाल्या आहेत. पाचव्या, सहाव्या व सातव्या असा तीन दिवसांत पालिकेला तीन हजार मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या, तर ५० टन निर्माल्य गोळा झाले आहे. एकीकडे सांगलीकरांनी मूर्ती व निर्माल्य दान मोहिमेला प्रतिसाद दिला असताना, मिरजेत मात्र याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत शासकीय यंत्रणांकडून वारंवार महापालिका प्रशासनाचे कान उपटले आहेत. कधी शेरीनाल्यातून, तर कधी सांडपाणी थेट नदीत सोडल्याप्रकरणी महापालिकेवर लाखो रुपये दंडाची कारवाई झाली आहे.
त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात महापालिकेची यंत्रणाही सतर्क झाली होती. विविध सेवाभावी संस्था-संघटनांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. घरोघरी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. महापालिकेने गणेश विसर्जनाचीही जय्यत तयारी केली. सांगली व मिरजेत कृष्णा नदीतच मोठ्या प्रमाणात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन होत असते. त्यासोबतच निर्माल्यही नदीतच टाकले जाते. कृष्णेचे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत.
महापालिकेच्यावतीने गणपती विसर्जनाकरिता निश्चित केलेल्या ठिकाणांवर निर्माल्य व गणेशमूर्ती दान करण्याची मोहीम राबविली. जलप्रदूषण टाळण्यासाठी बहुतांश नागरिकांकडून मूर्ती दान केल्या जात आहेत व निर्माल्य जमा करण्यात येत आहे. महापालिकेने गव्हर्न्मेंट कॉलनीतील हसनी आश्रम बसस्टॉप, महादेव मंदिर, विश्रामबागला हॉटेल पै प्रकाशच्या मागे, वाडीकर मंगल कार्यालयासमोर, सह्याद्रीनगर येथे दत्त मंदिर, संजयनगर येथील बिरनाळे हायस्कूल या उपनगरांत कृत्रिम कुंड तयार केले. तसेच माई घाट, सरकारी घाट, विष्णू घाट, सांगलीवाडी घाट यांसह मिरजेतील गणेश तलाव परिसरातही मूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठी यंत्रणा उभारली. महापालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
मागीलवर्षी दोन हजार मूर्ती दान स्वरूपात महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या दिवशी घरगुती गणपतींसह अनेक मंडळांच्या श्रींचे विसर्जन झाले आहे. या तीन दिवसात पालिकेला २८३० मूर्ती दान स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. पाचव्या दिवशी ८३०, सहाव्या दिवशी ९००, तर सातव्या दिवशी ११०० मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या.
मूर्तीसोबतच निर्माल्य दान करण्यासाठीही नागरिकांनी प्रतिसाद दिला. तीन दिवसात सांगलीत ३५ टन, तर मिरजेत १७ टन निर्माल्य जमा झाले आहे. निर्माल्य व गणेशमूर्ती दान करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांची मदत महापालिकेला लाभली. (प्रतिनिधी)


मिरजेत अत्यल्प प्रतिसाद
सांगलीकरांनी गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठी जोरदार प्रतिसाद दिला असताना, मिरजेतून मात्र या मोहिमेला अपेक्षित यश मिळालेले नाही. महापालिकेने मिरजेतील गणेश तलावासह काही ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे, पण मिरजेत मात्र मूर्ती दान करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. विसर्जनाच्या तीन दिवसात मिरजेतून १७ टन निर्माल्य जमा झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Concept of Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.