‘सांगली व्यापार बंद’ला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: August 25, 2014 22:53 IST2014-08-25T22:41:07+5:302014-08-25T22:53:25+5:30
एलबीटीचा तिढा : कर न भरण्याचा पुनरूच्चार; कृती समितीने दिला बेमुदत बंदचा इशारा

‘सांगली व्यापार बंद’ला संमिश्र प्रतिसाद
सांगली : एलबीटी वसुलीसाठी महापालिकेने बँक खाती गोठविण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या ‘सांगली बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एलबीटीविरोधात कृती समितीने शहरात मोटारसायकल रॅली काढून दुकानाच्या प्रतिकात्मक चाव्या महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केल्या. महापालिकेचे नेते व लोकप्रतिनिधीकडून याप्रश्नी तोडगा काढेपर्यंत कर न भरण्याचा पुनरुच्चारही व्यापाऱ्यांनी केला.
दीड वर्षाच्या खंडानंतर महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी एलबीटी वसुलीसाठी कडक पाऊले उचलली आहेत. गेल्याच आठवड्यात ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती गोठविण्यात आली, तर आणखी १०० व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्याची तयारी सुरू केली आहे. एलबीटी लागू झाल्यापासून सांगलीतील व्यापारी संघटनांनी असहकार आंदोलन हाती घेत कराचा भरणा केलेला नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. आयुक्तांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज एलबीटीविरोधी कृती समितीने सांगली बंदची हाक दिली होती.
या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सांगलीतील कापड पेठ व सराफ कट्टा या दोन मोठ्या बाजारपेठा सोमवारी बंदच असतात. उर्वरित गणपती पेठ, मारुती रोड, हरभट रस्ता या भागातील दुकाने सकाळी बंद होती. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, सुदर्शन माने, मुकेश चावला यांच्या नेतृत्वाखाली गणपती मंदिरापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून महापालिकेच्या मुख्यालयासमोर रॅलीची सांगता झाली. यावेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त कारचे यांची भेट घेऊन चर्चा केली. पण ही शिष्टाईही आयुक्तांनी फेटाळून लावत एलबीटी वसुलीत माघार घेणार नाही, असेही स्पष्टपणे सुनावले. यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी समीर शहा यांनी कोणत्याही स्थितीत एलबीटी भरणार नसून, महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर दडपशाही सुरू आहे. गणेशोत्सवानंतर बेमुदत सांगली बंदचा इशाराही त्यांनी दिला. नगरसेवक गौतम पवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत महापालिकेची कारवाई चुकीची असल्याचे सांगितले.
दुपारी दोननंतर काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू केले होते. गणपती पेठ व परिसरातील दुकाने बऱ्यापैकी उघडली होती. मार्केट यार्डातही बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. यार्डातील मोजकी दुकाने सोडता सर्वत्र व्यवहार सुरळीत होते. सायंकाळनंतर शहरातील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले होते.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील या आंदोलनामुळे जवळपास ३ ते ४ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होती. एकीकडे व्यापाऱ्यांचे आंदोलन आणि दुसरीकडे महापालिकेची वसुली सुरू होती. महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे गेल्या चार दिवसात अडीच कोटीहून अधिक एलबीटी वसुली झाली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)