मराठा मोर्चासाठी जिल्ह्यातील तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:39 IST2017-08-03T00:39:57+5:302017-08-03T00:39:57+5:30

Complete the district preparations for the Maratha Morcha | मराठा मोर्चासाठी जिल्ह्यातील तयारी पूर्ण

मराठा मोर्चासाठी जिल्ह्यातील तयारी पूर्ण

ठळक मुद्दे दीड लाख लोक मुंबईला जाणार


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुंबईत ९ आॅगस्टला निघणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील सुकाणू समितीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील मोर्चाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे व पार्किंगसंदर्भातील नकाशे तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातून किमान दीड लाख लोक मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, आजवर राज्यात मराठा समाजाचे एकूण ५१ मोर्चे निघाले. तरीही अद्याप हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे मुंबईचा निर्णायक मोर्चा काढण्याची तयारी राज्यभरातील समाजबांधवांनी केली आहे.
गेल्या महिन्याभरापासून याची तयारी सुरू आहे. मुंबईत राज्यस्तरीय बैठकीत नियोजनाबाबत अनेकवेळा चर्चा होऊन त्यापद्धतीने नियोजनही झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच लोक घेऊन त्याचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. सरकारकडे काय मागण्या करायच्या, याचा मसुदा तयार झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील तयारी पूर्ण झाली असली तरी, मोर्चाच्या दिवसापर्यंत नियोजनात सुकाणू समिती लक्ष देणार आहे. जिल्ह्यातील ७९४ गावे आणि वाड्या-वस्त्यांपैकी जवळपास पावणेसहाशे गावांपर्यंत मराठा क्रांती मोर्चासंदर्भात संवाद साधण्यात आला आहे.
ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईला निघणाºया मोर्चामध्ये प्रत्येकाने स्वखर्चाने सहभागी होण्यासाठी यायचे आहे. मुंबईमध्ये मोर्चाच्यादिवशी ३ कोटीहून अधिक समाजबांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत ज्यांचे नातेवाईक व मित्र आहेत, अशा लोकांनी तीन दिवस अगोदरच मुंबई गाठावी. रेल्वेगाड्यांची माहितीही प्रत्येकाने घ्यावी, म्हणजे मुंबईला जाताना कोणताही त्रास होणार नाही.
पनवेलपर्यंत जाण्यास जिल्ह्यातील लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याठिकाणाहून लोकलने आझाद मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. मोर्चात सहभागी होणाºया लोकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून नियोजनावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे, असे पाटील म्हणाले.
यावेळी श्रीरंग पाटील, धनंजय वाघ, विलास देसाई, संदीप पाटील, राहुल पाटील, अशोक पाटील, धनाजी कदम, विजय पाटील, मनीषा माने आदी उपस्थित होते.
पार्किंगसाठी पुरेशी जागा
मुंबईमध्ये पनवेल ते वाशिमपर्यंत रेल्वे लाईनच्या बाजूस पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. पार्किंगसाठी नकाशात उल्लेख केलेल्या जागांमध्ये समाजबांधवांनी अपाली वाहने लावावीत, असे आवाहन संजय पाटील यांनी यावेळी केले.
प्रत्येक घरातून एकजण
मराठा समाजाच्या मोर्चासाठी जिल्ह्यातील प्रत्येक घरातून एकतरी व्यक्ती सहभागी व्हावी, अशी अपेक्षा आहे. समाजाला पाठिंबा देण्यासाठी अन्य समाजाच्या लोकांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्वांचे आम्ही स्वागत करीत आहोत.
सांगली, मिरजेत रॅली
येत्या शनिवारी ५ आॅगस्ट रोजी सांगली व मिरजेत मोटारसायकल रॅली काढून मुंबईतील मराठा क्रांती मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहेत. मिरजेतील रॅली सांगलीतील रॅलीत सहभागी होणार आहे. याचे नियोजन येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.

Web Title: Complete the district preparations for the Maratha Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.