लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवोदयनगरमधील दोन वर्षे रखडलेल्या कामाबाबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकचे शहर अभियंता यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत सुधार समितीच्या वतीने तक्रार करण्यात आली होती.
येथील कामे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती. मंजूर कामे ठेकेदाराकडून करण्यास टाळाटाळ होत होती. शहर अभियंत्यांनी शिवोदयनगरच्या कामास भेट दिली असता, नागरिकांनी काम का थांबविले, असा जाब विचारला. यावेळी शाखा अभियंता ऋतुराज यादव यांनी स्थानिक नगरसेवकाने पत्र देऊन काम न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. मात्र, शहर अभियंता संजय देसाई यांनी स्थानिक नागरिकांकडून होत असलेली काम सुरू करण्याची आग्रही मागणी लक्षात घेऊन ताबडतोब काम सुरू करण्याची ग्वाही दिली. तत्काळ काम सुरू न झाल्यास स्थानिक नागरिक व सांगली जिल्हा सुधार समितीमार्फत तीव्र आंदोलन करून संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष जयंत जाधव, संतोष शिंदे, मयूर लोखंडे, बापू कोळेकर, रमेश डफळापुरे, आकाश भोसले, श्रीकांत लोखंडे, सचिन कोळेकर आदी उपस्थित होते.