ठकसेन जाधवविरुद्ध तक्रारींचा ओघ
By Admin | Updated: February 9, 2015 23:55 IST2015-02-09T23:53:18+5:302015-02-09T23:55:36+5:30
नोकरीचे आमिष : महिलेसह दोघे गायबच; तीन पोलीस ठाण्यात तपास

ठकसेन जाधवविरुद्ध तक्रारींचा ओघ
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयात टंकलिपिक पदावर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी ठकसेन विजय जाधव व स्मिता कन्नुरे या दोघांविरुद्ध सांगली शहर, विश्रामबाग व मिरज शहर पोलिसांत तक्रारींचा ओघ सोमवारीही सुरूच होता. आतापर्यंत या दोघांविरुद्ध या तीनही पोलीस ठाण्यात तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, सोमवारी सायंकाळी या तक्रारींचा आढावा घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. जाधव गेल्या वर्षभरापासून सांगलीत पत्रकार म्हणून वावरत होता. याचा फायदा घेत तो जिल्हाधिकारी कार्यालयात जायचा. यातून त्याने फसवणुकीचा हा फंडा सुरू केला. स्मिता कन्नुरे या महिलेस सोबत घेऊन त्याने फसवणुकीचे जाळे टाकले. या जाळ्यात दहा ते बारा तरुण अडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक तरुणाकडून त्यांनी ७० हजारापासून ते दीड लाखापर्यंत रक्कम घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती केली असल्याचे पत्रही त्यांनी दिले आहे. या पत्रावर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची सही, तसेच भारतीय राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणांनी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होणार असल्याची चाहूल लागताच जाधवने पलायन केले आहे. त्याचा तातडीने शोध घेण्याचे आदेश पोलीसप्रमुखांनी दिले आहेत. दरम्यान, तो काल (रविवारी) कोल्हापुरात फिरत होता, असे समजले. (प्रतिनिधी)