आष्ट्यातील सोमलिंग तलाव कात टाकणार

By Admin | Updated: June 5, 2015 00:19 IST2015-06-05T00:01:04+5:302015-06-05T00:19:49+5:30

सव्वादोन कोटी मंजूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून होणार कायापालट

The common lake in Ashtan will be cut | आष्ट्यातील सोमलिंग तलाव कात टाकणार

आष्ट्यातील सोमलिंग तलाव कात टाकणार

सुरेंद्र शिराळकर- आष्टा =आष्टा शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना आष्टा परिसरात महादेवाची आठ लिंगे स्थापन केली, अशी अख्यायिका आहे. यातील एक सोमलिंग तलावाच्या काठावर सोमेश्वर लिंग म्हणून प्रसिध्द आहे. या सोमेश्वर तलावाच्या ठिकाणी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून सव्वादोन कोटी खर्चून परिसर विकसित करण्यात येणार आहे.
आष्टा शहरात श्री त्र्यंबकेश्वर मर्दवाडी येथील कृष्णा नदीच्या काठावर आहे, तर लवंगेश्वर, रामलिंग, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, कपिलेश्वर, सिध्देश्वर, कल्लेश्वर ही सात लिंगे आष्टा येथे आहेत. या लिंगांवरूनच आष्टा शहरास आष्टा हे नाव पडले. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून आष्टा शहरातील महादेवाच्या सात लिंगांचा कोट्यवधी रुपये खर्च करून विकास करण्यात आला आहे. सोमलिंग तळ्याच्या काठावर हेमाडपंथी दगडी कोरीव काम केलेले सोमेश्वराचे मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे. प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस येथे भाविक गर्दी करतात. या मंदिरासमोरच पालिकेने तीर्थक्षेत्र योजनेतून सभागृह बांधले आहे. मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी पालिकेने येथील झाडे तोडली आणि या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले. आष्टा शहरात कोणतीच बाग नसल्याने आष्टा पालिकेने केंद्राकडे दिलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. सरोवर संवर्धन योजनेतून सव्वादोन कोटी रुपये खर्चून सोमलिंग तलावाचा परिसर विकसित करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखून या ठिकाणी नक्षत्र उद्यान वसविण्यात येणार आहे. बगीचा, विविध फुलझाडे, फळझाडे, रस्ते, गणपती विसर्जनासाठी तलाव, फूटपाथ व्ह्यू पॉर्इंट अशाप्रकारे सुंदर असे पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येणार आहे. माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या तलावाचा विकास करण्यात येत आहे, अशी माहिती नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, उपनगराध्यक्षा संगीता वारे, मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सरोवर संवर्धन योजनेतून सुमारे सव्वादोन कोटी मंजूर झाले असून शहर व परिसरातील सुंदर असे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येत आहे. लवकरच या कामास सुरूवात करणार आहे.
- मंगलादेवी शिंदे, नगराध्यक्षा

Web Title: The common lake in Ashtan will be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.