आयुक्तांविरुद्ध फौजदारी
By Admin | Updated: November 27, 2014 23:53 IST2014-11-27T23:13:14+5:302014-11-27T23:53:18+5:30
गॅस्ट्रो प्रकरण : जिल्हा सुधार समितीची न्यायालयात धाव

आयुक्तांविरुद्ध फौजदारी
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीने नऊजणांचा बळी गेल्याबद्दल महापालिका आयुक्तांवर जिल्हा सुधार समितीने न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी याप्रकरणी दि. ९ रोजी आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मिरज शहरात गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीचे थैमान सुरु आहे. अतिसारामुळे नऊ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या प्रकाराला केवळ महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून जिल्हा सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे व धनंजय भिसे यांनी अॅड. अमित शिंदे, अॅड. बशीर मुलाणी, अॅड. मंजुनाथ पाटील यांच्यामार्फत आयुक्त अजिज कारचे यांच्याविरूध्द मिरज न्यायालयात फौजदारी दाखल करून, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र महापालिका क्षेत्रात अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने गॅस्ट्रोची साथ पसरलेली आहे.
मिरजेतील जलवाहिनी १९५० मध्ये बसवली आहे. या जलवाहिन्यांची मुदत १९९० मध्ये संपली आहे. मात्र त्यानंतरही या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या पाणीपुरवठ्यासाठी वापरात आहेत. सांडपाणी वाहिन्यांची मुदत १९९९ मध्ये संपली आहे. यामुळे आरोग्यास धोकादायक असलेले सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
या दाव्याप्रकरणी ९ डिसेंबर रोेजी आयुक्तांनी हजर राहून म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)
नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत
महापालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांच्या झालेल्या मृत्यूला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुधार समितीने केला आहे. महापालिकेच्या कारभारास आयुक्त अजिज कारचे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.