कोरोना रुग्ण वाढू लागल्याने आयुक्त उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:18+5:302021-02-23T04:42:18+5:30
फोटो ओळी :- महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सार्वजनिक ठिकाणी अचानक भेटी दिल्या. ...

कोरोना रुग्ण वाढू लागल्याने आयुक्त उतरले रस्त्यावर
फोटो ओळी :- महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सार्वजनिक ठिकाणी अचानक भेटी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी भविष्यात धोका ओळखून आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सोमवारी खुद्द आयुक्त कापडणीस रस्त्यावर उतरले होते. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी केली. या पाहणी दौऱ्यामुळे नागरिक व दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
महापालिका क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या थोडीफार वाढली आहे. त्यात आजूबाजूच्या जिल्ह्यात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. नागरिकांकडून कोरोना त्रिसूत्रीचे पालन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडून कारवाई केली जात आहे.
सोमवारी खुद्द आयुक्त कापडणीस हेच रस्त्यावर उतरले. त्यांनी सांगली बसस्थानक, रिसाला रोडसह काही सार्वजनिक ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी अनेक दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. या दुकानदारांना दंड करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई केली. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, वैभव कुदळे, पंकज गोंधळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, श्रीकांत मद्रासी उपस्थित होते.
चौकट
३६ हजार दंड वसूल
मास्क न वापरणाऱ्या १६० लोकांकडून २८ हजार ८०० रुपये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या १२ जणांकडून ६ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका व थुंकणाऱ्या दहा व्यक्तींकडून एक हजार रुपये दंड असा एकूण ३५ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.