ॲपेक्सबाबत आयुक्तांनी भूमिका जाहीर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:00+5:302021-06-26T04:20:00+5:30
स्थायी समितीची ऑनलाईन सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत ॲपेक्स हॉस्पिटल प्रकरणावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मगदूम ...

ॲपेक्सबाबत आयुक्तांनी भूमिका जाहीर करावी
स्थायी समितीची ऑनलाईन सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत ॲपेक्स हॉस्पिटल प्रकरणावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मगदूम म्हणाले, ॲपेक्स हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. जाधव याला कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी एका अर्जावर एका दिवसात परवानगी देण्यात आली. त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली नाही. यातून महापालिकेची बदनामी होते आहे. आयुक्त कापडणीस मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. पोलिसांच्या चौकशीत प्रशासनाने रुग्णालयातील आवश्यक वैद्यकीय सुविधांची पडताळणी न करताच ॲपेक्सला परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाला इतकी घाई का झाली होती? याबाबत आयुक्त कापडणीस यांनी खुलासा करावा.
या प्रकरणाबाबत प्रशासनाकडून काहीच माहिती दिली जात नाही. वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे सभेला अनुपस्थित होते. सभापती कोरे यांचाही दूरध्वनी त्यांनी उचलला नाही. उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडे अर्धवट माहिती होती. पोलीस चौकशी करीत आहेत, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे प्रशासनाच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामध्ये जे अधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेची सुरू असलेली बदनामी थांबली पाहिजे, अशी मागणीही मगदूम यांनी केली.
चौकट :
‘वसंतदादा रुग्णालया’ला दीड वर्ष लटकवले
काँग्रेसचे विशाल पाटील यांनी वसंतदादा पाटील कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आयुक्तांनी दीड वर्षापासून परवानगीसाठी लटकविले होते; पण ॲपेक्सला एका दिवसात, कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता परवानगी दिली गेली, याचाही खुलासा आयुक्त कापडणीस यांनी करावा, अशी मागणी नगरसेवक मगदूम यांनी केली.