व्यावसायिक पाणीपट्टीत गोलमाल
By Admin | Updated: February 21, 2015 23:59 IST2015-02-21T23:54:25+5:302015-02-21T23:59:35+5:30
महापालिकेतील प्रकार : सहा हजार पाणी बिलांची नोंदच नाही; फेरआढावा सुरू

व्यावसायिक पाणीपट्टीत गोलमाल
सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नोंद असलेल्या व्यावसायिक पाणी बिलांमध्ये गोलमाल असल्याचा संशय शनिवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. हॉटेल्स्, रुग्णालये, उद्योग, व्यापारी संस्था आणि व्यावसायिकांची संख्या मोठी असतानाही महापालिकेकडे व्यावसयिक पाणी ग्राहकांची संख्या कमी का, असा सवाल उपमहापौर प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे याप्रकरणी ग्राहक प्रकारांचा फेरआढावा घेण्यास शनिवारपासून सुरुवात झाली.
महापालिकेत उपमहापौर प्रशांत पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक शनिवारी घेतली. यावेळी त्यांनी व्यावसायिक पाणी ग्राहकांची संख्या कमी असल्याबद्दल शंका उपस्थित केली. हॉटेल, रुग्णालये, सर्व्हिसिंग सेंटर्स, व्यापारी संस्था, छोटे व्यावसायिक, उद्योग यांची संख्या अधिक असताना व्यावसायिक ग्राहक कमी असल्याबाबत त्यांनी विचारणा केली. याबाबत फेरसर्वेक्षण करून पाणी ग्राहक प्रकारांचा अहवाल सादर करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले. शनिवारी याबाबतची कारवाई सुरू झाली.
पाणीपुरवठा विभागाकडून सध्या साडेसहा हजार नव्या ग्राहकांची बिले निघाली नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. सांगलीतील साडेपाच हजार आणि मिरजेतील एक हजारावर पाणी ग्राहकांची नोंद एचसीएलकडे झाली नव्हती. त्यामुळे महापालिकेने दीड वर्षापासून अशा ग्राहकांना बिलेच दिली नाहीत. याबाबत सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते यांना या ग्राहकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)