दिलासादायक : पुजारवाडी गाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:15+5:302021-05-28T04:20:15+5:30
दिघंची : संस्थात्मक विलगीकरण, ठोस उपाययोजना, नियमांची कडक अंमलबजावणी आणि ग्रामस्थांनीही नियमांचे काटेकोर पालन केल्याने आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी-दिघंची गाव ...

दिलासादायक : पुजारवाडी गाव कोरोनामुक्त
दिघंची : संस्थात्मक विलगीकरण, ठोस उपाययोजना, नियमांची कडक अंमलबजावणी आणि ग्रामस्थांनीही नियमांचे काटेकोर पालन केल्याने आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी-दिघंची गाव कोरोनामुक्त झाले आहे. आता गावात एकही कोरोनाबाधित नाही.
पुजारवाडी-दिघंचीला आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे; परंतु इमारतीअभावी ते सुरू नाही. दिघंची आरोग्य केंद्रांतर्गत याचा कारभार चालतो. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावात दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव केला व झपाट्याने रुग्णसंख्या वाढली. बघता बघता गावात १२३ जणांना लागण झाली.
तहसीलदारांच्या आदेशानुसार पुजारवाडी गावातच लसीकरण व कोरोना तपासणी सुरू करण्यात आली. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने लसीकरण व तपासणीवर भर दिला. रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना राबविल्याने, वेळेत औषधोपचार दिल्याने, गावात कडक अंमलबजावणी केल्याने व ग्रामस्थांनीही नियमांचे काटेकोर पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे.
चौकट
‘लोकमत’च्या दणक्याने यंत्रणेस गती
‘पुजारवाडीत कोरोनाचा धोका वाढला’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन तहसीलदार सचिन मुळीक यांनी आपत्ती समितीची बैठक घेतली व यंत्रणा कामाला लागली. मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायत व आरोग्य विभागास दिल्या. ‘लोकमत’च्या दणक्याने यंत्रणेस गती मिळाली.