संयुक्त उपचार प्रणालीने दिले कोरोनाग्रस्तांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:12+5:302021-09-17T04:31:12+5:30

गेल्या वीस महिन्यांपासून अवघ्या दुनियेला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूची कुंडली प्रगत देशांनाही अद्याप उलगडलेली नाही. त्याचे अैाषधोपचार म्हणजे अजूनही ...

The combined treatment system gave life to the corona victims | संयुक्त उपचार प्रणालीने दिले कोरोनाग्रस्तांना जीवदान

संयुक्त उपचार प्रणालीने दिले कोरोनाग्रस्तांना जीवदान

गेल्या वीस महिन्यांपासून अवघ्या दुनियेला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूची कुंडली प्रगत देशांनाही अद्याप उलगडलेली नाही. त्याचे अैाषधोपचार म्हणजे अजूनही अंधारात मारलेले तीर ठरत आहेत. प्रत्येक आठवड्याला कोरोनाचे नवनवे गुण आणि अैाषधांचे नवनवे प्रयोग जगभरात पुढे येत आहेत. या स्थितीत काही आयुर्वेद तज्ज्ञांनी ॲलोपॅथी आणि होमीओपॅथीच्या संयुक्त उपचारपद्धतीचा अवलंब केला. त्याचे अत्यंत दिलासादायी आणि सकारात्मक परिणाम समोर आले. इंटरनॅशनल आयुर्वेद मेडिकल जर्नल या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे नगारे वाजू लागले असताना या संयुक्त उपचारपद्धतीने आशेचा किरण दाखवला आहे.

कोरोनाच्या भीषण लाटेत अमेरीका, ब्रिटन आणि इटलीसारख्या अतिप्रगत वैद्यकीय तंत्रे उपलब्ध असणाऱ्या देशांतही माणसे पटापट मेली. अशावेळी भारतासारख्या जेमतेम आरोग्यव्यवस्थेच्या देशात कितीतरी गंभीर स्थिती ओढवण्याचा अंदाज होता, तो खरादेखील ठरला. या स्थितीत भारताचा परंपरागत आयुर्वेदच कोरोनाग्रस्तांना मृत्यूच्या दारातून परत आणेल हा आयुर्वेद तज्ज्ञांचा विश्वास होता. त्याच्या जोरावरच त्यांनी कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी संयुक्त उपचारपद्धती वापरली. त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम समोर दिसून आले. सांगलीतील एका रुग्णालयात शास्त्रोक्त नोंदीनिशी उपचारांची मालिका सुरू ठेवण्यात आली. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२० दरम्यान ४७१ रुग्णांपैकी ९३ जणांना संयुक्त उपचार दिले. त्यामुळे मृत्यूदर १०.२० टक्क्यांवरून २.१५ टक्क्यांपर्यंत खाली आला. ७६.३४ टक्के रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदी व्याधी होत्या, या हाय रिस्क रुग्णांनाही कोरोनामुक्त करण्यात यश आले. २७.९६ टक्के रुग्णांना प्राणवायूची गरज भासली नाही.

७२ टक्के रुग्णांचा एचआरसीटी स्कोअर ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता, त्यातील २६.५३ टक्के रुग्ण ऑक्सिजनशिवाय कोरोनामुक्त झाले. संयुक्त उपचार पद्धतीमुळे लक्षणे नियंत्रणात राहिली. रुग्णांच्या फुप्फुसांची ताकद वाढून फायब्रोसिस फैलावला नाही. आत्मविश्वास दुणावल्याने दुसऱ्या लाटेतही एप्रिलपासून उपचारपद्धती कायम ठेवण्यात आली. जुलैपर्यंत ८२० रुग्णांना उपचार दिले. दुसऱ्या लाटेत कोरोनाची लक्षणे तीव्र होती. एचआरसीटी स्कोअर अचानक वाढणे, ऑक्सिजन वेगाने घसरणे असे प्रकार होते. २० ते ४५ वर्षे वयोगटातील रुग्णसंख्या मोठी होती. ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागला. अनेकांना दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस व्हेन्टिलेटरवर ठेवावे लागले. या रुग्णांनाही संयुक्त उपचार पद्धतीचा फायदा झाला. हजारो वर्षांच्या कालौघात निसर्गात अनेक बदल झाले असले तरी मानवी शरीररचना कायम आहे. त्यामुळेच शरीर आणि निसर्गाला अनुकूल आयुर्वेदशास्त्राचा उपयोग आजही होत आहे. सांगलीतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रवींद्रकुमार माने तसेच डॉ. राम लाडे व सहकाऱ्यांनी ही उपचार प्रणाली अनेक रुग्णांना जीवदान देणारी ठरली.

चौकट

आयुर्वेदात ‘जनपदोध्वंस व्याधी’ म्हणजे एकाच वेळी अनेकांना होणाऱ्या संसर्गजन्य व्याधीबद्दल चांगले उपचार सांगितले आहेत.

तापामध्ये भूक मंदावते. न पचलेला भाग आम्ल स्वरुपात रक्तातून शरीरभर पसरतो. त्वचेची घामाची छिद्रे बंद होतात. ताप वाढत जातो. त्यामुळे तापात पचनशक्ती चांगली राहणे महत्त्वाचे ठरते. ताप मुरल्यास रक्तावर दुष्परिणाम होतात. लिव्हर, प्लीहा, किडनी, फुप्फुसे, स्नायू, त्वचेवरही परिणाम होतात. न पचलेला भाग रक्तात वाढतो. तो किडनीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न शरीर करते. परंतु पुरेशा निचऱ्याअभावी कफरूपाने फुप्फुसांत साचतो, त्यामुळे खोकला सुरू होतो. दम्याने ऑक्सिजनची पातळी कमी होते. आयुर्वेदिक उपचारांमध्ये ताप नियंत्रणात ठेवणे हा मुख्य हेतू असतो. संयुक्त उपचार पद्धतीत तापाला लक्ष्य करण्यात आले. फुप्फुसांमधील कफ कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. एचआरसीटी स्कोअर बारापेक्षा कमी असल्यास श्वासहर अैाषधे दिली. जास्त स्कोअरसाठी सुवर्णकल्प असलेले श्वासहर प्लस दिले. याचे अतिशय चांगले परिणाम दिसून आले. अडीच मिली मिथिलीन ब्ल्यू रुग्णाच्या जिभेखाली तसेच ऑक्सिजनच्या ह्युमिडिफायरमधून दिले. फुप्फुसातील कफ सुटून स्नायूंना ताकद मिळण्यासाठी व श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी रोज फिजिओथेरपी दिली. त्याचेही समाधानकारक परिणाम दिसले. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये १ हजार ३०० रुग्णांसाठी संयुक्त उपचारपद्धती वापरली. त्याचे अतिशय चांगले परिणाम दिसले

- संतोष भिसे

Web Title: The combined treatment system gave life to the corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.