सांगलीत लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST2021-01-09T04:21:39+5:302021-01-09T04:21:39+5:30
फोटो ०८ शीतल ०१ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेकडून कोविड १९ लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) ...

सांगलीत लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी
फोटो ०८ शीतल ०१
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेकडून कोविड १९ लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वी पार पडली. या ड्रायरनमध्ये २५ आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या. लसीकरणासाठी एका व्यक्तीसाठी तीन ते पाच मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
महापालिकेने २५ लाभार्थी निश्चित करून त्यांना ड्राय रनबाबत कल्पना दिली होती. शुक्रवारी सकाळी हे लाभार्थी आरोग्य केंद्रावर आल्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. एकेका लाभार्थ्याला शिस्तबद्धपणे लस देण्यात आली. नोंदणीनंतर त्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासण्यात आले. त्यानंतर शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली गेली. यानंतर प्रत्यक्ष लसीकरण आणि त्यानंतर ३० मिनिटे त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले गेले. आरोग्य केंद्रात प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष उभारण्यात आला होता.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. हेमंत खरनारे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. वर्षा धनवडे, डॉ. अक्षय पाटील, समर पवार, माधुरी पाटील, मनोज पवार उपस्थित होते.